Kolhapur Politics: माधवराव, तुम्ही शिरोळचे आमदार व्हा; चंद्रकांत पाटील यांनी दिली ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 04:35 PM2024-04-20T16:35:06+5:302024-04-20T16:35:38+5:30

'राज्यातही महायुतीचेच सरकार'

Madhavrao Ghatge, president of Gurudatta Sugar Factory in Shirol taluka, was offered MLA seat by Chandrakant Patil | Kolhapur Politics: माधवराव, तुम्ही शिरोळचे आमदार व्हा; चंद्रकांत पाटील यांनी दिली ऑफर 

Kolhapur Politics: माधवराव, तुम्ही शिरोळचे आमदार व्हा; चंद्रकांत पाटील यांनी दिली ऑफर 

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील बहुजन विकास आघाडीचे नेते व गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांना शुक्रवारी भाजपचे नेते व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिरोळ मतदारसंघातून तुम्ही आमदार व्हा, अशी ऑफर देऊन खळबळ उडवून दिली. शिरोळ विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा शिरोळमध्ये झाला.

या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलताना माधवराव घाटगे यांनी आपण मंत्री पाटील यांच्या प्रयत्नांतून शिरोळ तालुक्यासाठी ७५ कोटींचा निधी आणला असल्याचे सांगितले. महापुराचे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी ३२०० कोटींचा निधी मंजूर झाला. त्याच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगितले. तो संदर्भ घेऊन मंत्री पाटील आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनीही माधवराव, आता तुम्हीच आमदार व्हा, असे जाहीर करून टाकले; परंतु घाटगे यांनी त्यावर मला राजकारणात पडायचे नाही. मी साखर उद्योगात आहे तेच बरे असल्याचे सांगून विधानसभेची ऑफर नम्रपणे नाकारली.

मंत्री पाटील म्हणाले, महायुती सरकारने मराठा आरक्षण दिले नाही, असा गैरसमज पसरविला जात आहे. महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. त्यांनी कधी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री काळात मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकविता आले नाही.

तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास माजी आमदार सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, विजय भोजे, राहुल घाटगे, धैर्यशील घाटगे, डॉ. नीता माने, डॉ. अरविंद माने, सोनाली मगदूम, सतीश मलमे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मिलिंद भिडे यांनी आभार मानले.

राज्यातही महायुतीचेच सरकार

देशात मजबूत सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातही महायुतीचेच मजबूत सरकार येईल. येत्या डिसेंबर-जानेवारीमध्ये न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या सर्वांना बळ मिळून सर्वांच्या समस्या संपतील असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

यड्रावकर-घाटगे यांच्यात संघर्ष

शिरोळ मतदारसंघाचा आमदार करण्यात घाटगे यांची भूमिका मागच्या दोन निवडणुकांत निर्णायक राहिली आहे. या मतदारसंघाचे आता शिंदेसेनेचे सहयोगी आमदार राजेंद यड्रावकर हे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यात व घाटगे यांच्यात विकासकामांचे उद्घाटन करण्यावरूनही मध्यंतरी संघर्ष झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यड्रावकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना प्रचारासाठी सक्रिय केले आहे; परंतु ते अजून म्हणावे तसे प्रचारात उतरलेले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांची आमदारकीची ऑफर शिरोळला राजकीय धुरळा उडवून देणारी आहे.

Web Title: Madhavrao Ghatge, president of Gurudatta Sugar Factory in Shirol taluka, was offered MLA seat by Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.