कोल्हापुरात चार महिन्यांत ४३८ अपघात; १५३ जण ठार; जीवघेणा प्रवास थांबणार कधी? 

By उद्धव गोडसे | Published: May 10, 2024 12:25 PM2024-05-10T12:25:30+5:302024-05-10T12:27:20+5:30

बेदरकारपणे वाहन चालवणे जीवावर बेतत आहे

438 accidents in four months in Kolhapur; 153 people lost their lives | कोल्हापुरात चार महिन्यांत ४३८ अपघात; १५३ जण ठार; जीवघेणा प्रवास थांबणार कधी? 

संग्रहित छाया

उद्धव गोडसे

कोल्हापूर : काही प्रमाणात रस्ते सुधारले तरी वाहनधारक सुधारत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवणे जीवावर बेतत आहे. दरवर्षी हजारो लोक आयुष्यभरासाठी जायबंदी होतात. लाखो रुपयांच्या वाहनांचा चक्काचूर होतो. तरीही वाहतूक नियमांचे पालन होत नाही आणि वेगाची नशा जात नाही. त्यामुळे वाढते रस्ते अपघात आणि त्यात होणारी जीवितहानी ही नवी समस्या निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत ४३८ अपघातांची नोंद झाली. यात १५३ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर २१८ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातांमुळे जीवितहानीसह वाहनांचेही मोठे नुकसान होतेच. मात्र, त्यासोबतच अपघातात दगावलेल्या व्यक्तींचे कुटुंब उद्ध्वस्त होते. वाढत्या अपघातांच्या आकडेवारीवरून ही समस्या गंभीर बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशात दरवर्षी कोणत्याही साथीच्या आजारात दगावणाऱ्या व्यक्तींपेक्षा अधिक किंवा जगभरात सुरू असलेल्या युद्धांमध्ये मरणाऱ्या व्यक्तींपेक्षा भारतात रस्ते अपघाती मृत्यूंची संख्या जास्त आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०२४ मध्ये ४३८ अपघातांची नोंद झाली. काही किरकोळ अपघातांच्या नोंदी पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्या परस्पर बाहेरच मिटवल्या जातात.

२०२३ मध्ये जिल्ह्यात १२७३ अपघातांची नोंद झाली होती. त्यात ४५४ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा पहिल्या चार महिन्यांतच अपघातांची संख्या ४३८ वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या १५३ एवढी झाली. पुढे पावसाळा, पर्यटन हंगाम आणि ऊस तोडणी हंगामात अपघातांची संख्या वाढते. यामुळे अपघात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे-बेंगळुरू महामार्गासह रत्नागिरी-नागपूर, गगनबावडा, आंबोली या मार्गांचे रुंदीकरण सुरू आहे. काही जिल्हा आणि राज्य मार्गांचेही रुंदीकरण सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची गती मंदावली असून, पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवली आहे. मात्र, बेदरकार वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वत:सह इतरांच्याही जिवाशी खेळ करत आहेत. विशेषत: पुणे-बेंगळुरू महामार्ग, कोल्हापूर ते आंबा घाट, शिरोली पुलाची ते सांगली या मार्गांवर अपघातांची मालिकाच सुरू असते. राधानगरी, गगनबावडा आणि गारगोटी मार्गांवरही अलीकडे अपघातांची संख्या वाढली आहे. वाढते अपघात आणि त्यातील मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे.

चार महिन्यांतील अपघात

  • एकूण अपघात - ४३८
  • अपघाती मृत्यू - १५३
  • गंभीर जखमी - २१८
  • किरकोळ जखमी - २८
  • बिगर दुखापत अपघात - २३


कुटुंबांची घडी विस्कटते

घरातील कर्ती व्यक्ती अपघातात दगावल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची घडी विस्कटते. मुलाबाळांच्या शिक्षणाची आबाळ होते. अपघातात जायबंदी झालेल्या व्यक्तीची संपूर्ण कुटुंबाला जबाबदारी घ्यावी लागते. यासाठी नातेवाईक अडकून पडतात. कुटुंबाचे आर्थिक नुकसान होते. यातून सावरण्यासाठी खूप वेळ जातो. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळणे हेच हिताचे ठरते.

Web Title: 438 accidents in four months in Kolhapur; 153 people lost their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.