'रास्त भाव, तत्काळ पैसा'; मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातील हळद हिंगोलीच्या मार्केट यार्डात

By रमेश वाबळे | Published: April 16, 2024 07:17 PM2024-04-16T19:17:56+5:302024-04-16T19:18:24+5:30

समाधानकारक भाव, विश्वासार्हता आणि हळद विक्री केल्यानंतर पैसे तत्काळ मिळत असल्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत.

Turmeric in the market yard of Hingoli in Khandesh, Vidarbha with Marathwada | 'रास्त भाव, तत्काळ पैसा'; मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातील हळद हिंगोलीच्या मार्केट यार्डात

'रास्त भाव, तत्काळ पैसा'; मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातील हळद हिंगोलीच्या मार्केट यार्डात

हिंगोली : हळद खरेदी-विक्रीसाठी सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मराठवाड्यासह विदर्भ आणि खान्देशातून हळदीची आवक होत आहे. त्यामुळे मार्केट यार्ड आवारासह बाहेरही वाहनांच्या रांगा लागत असून, जवळपास २० हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आल्याची माहिती बाजार समितीने दिली.

सध्या बहुतांश भागातील शेतकऱ्यांकडे नवीन हळद उपलब्ध झाली आहे. तर काही शेतकऱ्यांची हळद काढणीची लगबग सुरू आहे. बाजारात सध्या भाव समाधानकारक असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे हळद उपलब्ध झाली, ते आता आणखी भाववाढीची अपेक्षा न करता विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे मागील आठवड्यापासून आवक वाढली असून, मार्केट यार्ड आवारासह बाहेर वाहनांच्या एक ते दीड किमीपर्यंत रांगा लागत आहेत.

मार्केट यार्डात शनिवारी व रविवारी हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे दर सोमवारी हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे पाचशे ते सातशे रुपयांची घसरण झाली असली तरी सध्या मिळणारा भाव समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आणखी भाववाढीची आशा न करता शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत.

समाधानकारक भाव, विश्वासार्हता आणि हळद विक्री केल्यानंतर पैसे तत्काळ मिळत असल्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत. १६ एप्रिल रोजी हिंगोलीसह नांदेड, परभणी, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, अकोला, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणल्याचे बाजार समितीने सांगितले.

अवकाळीने वाढविली चिंता...
जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांकडून हळद काढणीचे काम सुरू आहे. त्या हळदीवर तर अवकाळी पावसाचे पाणी फेरल्या जात आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अगोदर हळद काढून विक्रीसाठी आणली, त्यांची हळद वाहनात भिजण्याची शक्यता निर्माण होत आहे. शेतकरी ताडपत्री झाकून हळद विक्रीस आणत आहेत. परंतु जोरात पाऊस झाल्यास हळदीपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मार्केट यार्डात २९५, तर गेटच्या बाहेर १३५ वाहनांची रांग....
मागील दोन दिवसांत मार्केट यार्डात हळदीची आवक विक्रमी होत आहे. मंगळवारी दुपारपर्यंतच्या नोंदीनुसार हळद विक्रीसाठी घेऊन आलेली २९५ वाहने हळद मार्केट यार्ड आवारात, तर १३५ वाहनांची मार्केट यार्डच्या गेटबाहेर रस्त्यावर रांग लागली होती. या वाहनांतील हळद मोजमापासाठी ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या वाहनांनाच मार्केट यार्डात प्रवेश दिला जाणार असल्याचे बाजार समितीने कळविले आहे. यासंदर्भात आडते, व्यापाऱ्यांनाही सूचना केल्या आहेत.

Web Title: Turmeric in the market yard of Hingoli in Khandesh, Vidarbha with Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.