गडचिरोलीत अन्नपदार्थ तपासणीची लॅबच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 05:32 PM2024-04-27T17:32:55+5:302024-04-27T17:36:08+5:30

Gadchiroli : नागपूर, पुणे, मुंबईला पाठवतात नमुने

There is no food inspection lab in Gadchiroli | गडचिरोलीत अन्नपदार्थ तपासणीची लॅबच नाही

No Food Inspection Lab in Gadchiroli

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
विविध सण, उत्सव, कार्यक्रमांत विविध वस्तूंची खरेदी- विक्री मोठ्या प्रमाणात होते. यात मिठाई, फराळ व अन्य वस्तूंचाही समावेश असतो; परंतु याच कालावधीत भेसळ व बनावट खाद्यपदार्थ किंवा मिठाई घरी येण्याचा धोका असतो. यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून नमुने घेतले जातात; मात्र जिल्हास्थळी गडचिरोली येथे नमुने तपासणीची लॅब नसल्याने तपासणीनंतरचा अहवाल दोन ते तीन किंवा चार ते पाच महिन्यांपर्यंत प्राप्त होत नाही. परिणामी संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया लांबणीवर पडते.

जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागात अनेक पदे रिक्त आहेत. अन्न विभागात दोन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पदे मंजूर असले तरी केवळ एकच पद भरलेले आहे. याशिवाय लिपिकवर्गीय व अन्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच संपूर्ण जिल्ह्यात तपासणी करण्याचा भार असतो. नमुने गोळा केल्यानंतर कागदपत्रे तयार करणे, नमुन्यांची पॅकिंग करणे, पत्र पाठविणे तसेच संबंधित नमुन्यांची प्रक्रिया कुठपर्यंत आली, याबाबतचाही पाठपुरावा त्याच अधिकाऱ्यांना घ्यावा लागतो. सोबतच जिल्ह्याच्या विविध भागांत भेटी देऊन तपासणीही करावी लागते. गडचिरोली जिल्ह्यात खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची लॅब नाही. जिल्ह्यातील नमुने सुरुवातीला नागपूर येथे पाठवावे लागतात. नागपूर येथे अनेक जिल्ह्यांतून नमुने तपासणीसाठी यापूर्वीच आलेले राहत असल्याने मागाहून आलेले नमुने तपासणीसाठी उशीर होतो. प्रत्येक जिल्ह्यासाठी विशिष्ट ठिकाणची लॅब ठरवून दिली असल्याने तेथेच सुरुवातीला नमुने पाठवावे लागतात. परिणामी तपासणीसाठी उशीर होतो.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
अन्नपदार्थ तपासणी लॅब निर्माण करण्याची मागणी काही वर्षांआधी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. निवेदनही दिले. मात्र शासन तसेच लोकप्रतिनिधींनी हा विषय फार गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे येथे लॅब झाली नाही.


 

Web Title: There is no food inspection lab in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.