गडचिरोलीत स्वत:हून पोस्टींग घेणारे बीडचे भूमिपुत्र पाखरे आयएएस; पहिल्याच प्रयत्नात यश

By संजय तिपाले | Published: April 16, 2024 05:01 PM2024-04-16T17:01:22+5:302024-04-16T17:05:12+5:30

निवडणूक कर्तव्यावर असताना 'गुड न्यूज'.

abhijit pakhare group development officer of beed who sought the opportunity to serve in remote areas has succeeded in upsc exam | गडचिरोलीत स्वत:हून पोस्टींग घेणारे बीडचे भूमिपुत्र पाखरे आयएएस; पहिल्याच प्रयत्नात यश

गडचिरोलीत स्वत:हून पोस्टींग घेणारे बीडचे भूमिपुत्र पाखरे आयएएस; पहिल्याच प्रयत्नात यश

संजय तिपाले, गडचिरोली : माओवादग्रस्त गडचिरोलीत नियुक्ती म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दृष्टीने शिक्षा समजली जाते, पण अतिदुर्गम भागात सेवेची संधी स्वत:हून मागणारे बीडचे भूमिपुत्र व गटविकास अधिकारी अभिजित पाखरे यांनी युपीएससी २०२३ च्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केले आहे. १६ एप्रिलला दुपारी ही 'गुड न्यूज' कळाली  तेव्हा पाखरे हे अतिदुर्गम अहेरीत निवडणूक कर्तव्य बजावत होते.

अभिजित गहिनीनाथ पाखरे हे मूळचे शिरुर कासार तालुक्यातील पाडळी (जि. बीड) येथील आहेत. त्यांचे आई- वडील शिक्षक आहेत. त्यामुळे घरात शिक्षणाचे वातावरण होते. खासगी शाळेत शिक्षक असलेले वडील ग्रामपंचायतीचे सरपंचही आहेत. २०१९ मध्ये त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी या पदासाठी त्यांची निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर नाशिकच्या येवला येथे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी म्हणून काम केल्यावर त्यांची नियमित पहिली नियुक्ती होणार होती. आदिवासीबहुल, मागास व अतिदुर्गम भागातून प्रशासकीय सेवेचा 'श्रीगणेशा' करण्याच्या हेतूने त्यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहून गडचिरोलीत पोस्टींग द्या, अशी विनंती केली होती. त्यानुसार त्यांना गडचिरोलीच्या अहेरी या अत्यंत संवेदनशील ठिकाणी गटविकास अधिकारी म्हणून नेमले होेते. १३ मार्च २०२४ पासून ते अहेरीत कर्तव्य बजावत होते. दरम्यान, त्यांनी २०२३ मध्ये युपीएससी २०२३ च्या नागरी सेवा परीक्षाही दिली होती. यात ७२० व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाच वर्षाव होत आहे.

असा राहिला शैक्षणिक प्रवास...

अभिजित पाखरे यांनी गावातील जि.प. शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण बीडच्या चंपावती विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी पदवी संपादन केल्यावर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. आधी एमपीएससी व नंतर युपीएससी क्रॅक करत बीडचा झेंडा फडकावला.

Web Title: abhijit pakhare group development officer of beed who sought the opportunity to serve in remote areas has succeeded in upsc exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.