मानसिक प्रदूषण

By Admin | Published: September 23, 2016 12:52 AM2016-09-23T00:52:04+5:302016-09-23T00:52:04+5:30

राजधानी दिल्लीतील वर्दळीच्या मार्गावर भरदिवसा एका असहाय्य तरुणीवर एक माथेफिरु चाकूने सपासप वार करतो, त्याच्या हल्ल्यात सापडलेली तरुणी जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाका मारते

Mental pollution | मानसिक प्रदूषण

मानसिक प्रदूषण

googlenewsNext

राजधानी दिल्लीतील वर्दळीच्या मार्गावर भरदिवसा एका असहाय्य तरुणीवर एक माथेफिरु चाकूने सपासप वार करतो, त्याच्या हल्ल्यात सापडलेली तरुणी जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाका मारते, पण त्या नराधमाचा रौद्र अवतार बघून जाणायेणाऱ्यांपैकी कुणीही पुढे येण्यास धजावत नाही व बघता बघता अवघ्या काही सेकंदात तब्बल ३२ वार करुन तो माथेफिरु त्या २१ वर्षीय तरुणीचा अंत करतो व पुन्हा तिला लाथेने तुडवतो, हे सारे कशाचे लक्षण मानायचे? परंतु इतके सारे करुन झाल्यानंतरही त्याचा संताप शांत झाला नाही म्हणून की काय तो तिच्या कलेवराचे डोळे काढण्याचाही प्रयत्न करतो. काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना बघून समाजमन ढवळून निघाले. तरुणीचा नकार सहन न झाल्याने त्याने तिला आयुष्यातूनच संपवून टाकले. मन विचलित करणारी आणखी एक घटना बेंगळुरातही घडली. २२ वर्षीय तरुणीने केवळ १०० रुपये आणि मटण बिर्याणीसाठी एकदोन नव्हे तर चक्क ४२ बसेस जाळल्या. कावेरी तंट्यावरुन सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान घडलेल्या या प्रकाराची या तरुणीने स्वत: पोलिसात कबुली दिली आहे. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरातही ती डिझेल ओतून बसेस पेटविताना स्पष्ट दिसते आहे. इकडे पुण्यात तर एका तरुणाने वडिलांच्या रागावरून स्वत:च्या दुचाकीसह परिसरातील अनेक वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड केल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे. कामधंदा न करता रिकामटेकडा का फिरतोय, अशी विचारणा वडिलांनी केल्याने त्याचा राग अनावर झाला होता. या तीनही घटनांचा मागोवा घेताना एवढे क्रौर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता आजच्या तरुण पिढीत कशी निर्माण झाली हा प्रश्न मनाला भेडसावतो. एवढी अस्वस्थता का आहे? अगदी क्षुल्लक कारणांवरुन लोक हिंसक होत आहेत त्यामुळे जगण्यातील सहजता आम्ही गमावून बसलो आहोत. परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. नकारात्मकता वाढली असून असहिष्णुतेने कळस गाठला आहे. ही बिघडती परिस्थिती बघता विकासाच्या शर्यतीत घोडदौड करणाऱ्या या देशात समाजाच्या आणि प्रामुख्याने तरुण पिढीच्या मानसिक स्वास्थ्याचीही तेवढीच काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. पर्यावरणातील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पण हे सामाजिक आणि मानसिक प्रदूषण कसे थोपवायचे, याचाही विचार आता तातडीने करावा लागणार आहे.

Web Title: Mental pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.