सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 10:48 AM2024-05-06T10:48:09+5:302024-05-06T10:49:20+5:30

करावल नगरमध्ये भेसळयुक्त मसाल्यांचे उत्पादन करणाऱ्या दोन कारखान्यांवर छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान एका कारखान्यातून दिलीप सिंह आणि खुर्शीद मलिक नावाचे दोन लोक सापडले. हे लोक भेसळयुक्त मसाले तयार करत होते.

delhi police busted two fake spice manufacturing units karawal nagar rotten rice | सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश

फोटो - आजतक

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने करावल नगरमध्ये अशा दोन कारखान्यांचा पर्दाफाश केला आहे, जेथे सडलेला तांदूळ, लाकडाचा भुसा आणि केमिकलसह भेसळ केलेले मसाले तयार केले जात होते. हे दोन्ही कारखाने दिल्लीतील करावल नगर येथे आहेत. या घटनेत तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी करावल नगर येथून 15 टन भेसळयुक्त मसाले आणि कच्चा माल जप्त केला आहे. आरोपी संपूर्ण एनसीआर आणि इतर राज्यात भेसळयुक्त मसाल्यांचा पुरवठा करत होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा विभागाने मसाल्यांचे नमुने घेतले आहेत. दिलीप सिंह उर्फ ​​बंटी, सरफराज आणि खुर्शीद मलिक अशी आरोपींची नावं आहेत. ईशान्य दिल्लीतील अनेक उत्पादक आणि दुकानदार वेगवेगळ्या ब्रँड नावाने भेसळयुक्त मसाले तयार करून दिल्ली-एनसीआरमध्ये विकत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. 

करावल नगरमध्ये भेसळयुक्त मसाल्यांचे उत्पादन करणाऱ्या दोन कारखान्यांवर छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान एका कारखान्यातून दिलीप सिंह आणि खुर्शीद मलिक नावाचे दोन लोक सापडले. हे लोक भेसळयुक्त मसाले तयार करत होते. दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने त्यांना पकडले. पोलिसांनी कारखान्यातील मालाची तपासणी केली असता, सडलेला तांदूळ, बाजरी, खराब झालेला नारळ, लाकडाचा भुसा, केमकिल आणि अनेक झाडांच्या सालापासून मसाले तयार केले जात असल्याचे आढळून आले. 

हे मसाले प्रत्येकी 50 किलोच्या मोठ्या पेटीत ठेवून बाजारात विकले जात होते. पथकाने अन्न व सुरक्षा विभागाला माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. भेसळयुक्त मसाले पश्चिम उत्तर प्रदेश आणि देशातील विविध राज्यांमध्ये पाठवले जात असल्याचं आरोपींनी सांगितलं. करावल नगर येथील या दोन कारखान्यांवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण 15 टन भेसळयुक्त मसाले आणि कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. हे प्रत्येकी 50 किलोच्या बॉक्समध्ये ठेवले जात होते. छाप्यादरम्यान खालील गोष्टी सापडल्या आहेत. 

- 1050 किलो सडलेला तांदूळ
- 200 किलो सडलेली बाजरी
- 6 किलो खराब नारळ
- 720 किलो खराब धणे
- 550 किलो खराब हळद
- 70 किलो निलगिरीची पाने
- 24 किलो सायट्रिक एसिड
- 400 किलो लाक़डाचा भूसा
- 2150 किलो पशुखाद्य कोंडा
- 440 किलो खराब लाल मिरची
- 150 किलो मिरचीचे देठ
- 5 किलो रासायनिक रंग
 

Web Title: delhi police busted two fake spice manufacturing units karawal nagar rotten rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.