ईएसआयसी दवाखान्यात रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 07:17 PM2019-02-28T19:17:39+5:302019-02-28T19:18:02+5:30

पंढरपुरातील राज्य कामगार विमा रुग्णालयात (ईएसआयसी) रुग्णांची हेळसांड सुरूआहे.

 Patients residing in ESIC clinic | ईएसआयसी दवाखान्यात रुग्णांची हेळसांड

ईएसआयसी दवाखान्यात रुग्णांची हेळसांड

googlenewsNext

वाळूज महानगर : पंढरपुरातील राज्य कामगार विमा रुग्णालयात (ईएसआयसी) रुग्णांची हेळसांड सुरूआहे. लंचच्या नावाखाली मंगळवारी तब्बल दीड तास दवाखाना बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला.


वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ईएसआयसीने बजाजनगर येथे ईएसआयसी दवाखाना सुरूकेला. मात्र, काही दिवसांपासून हा दवाखाना आरोग्य सुविधा देण्याऐवजी इतर कारणाने चर्चेत आहे. दवाखान्यात गोळ्या औषधांचा कायम तुटवडा असतो. पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने रुग्णांना चांगले उपचार मिळत नाहीत. काही दिवसांपूर्वी इमारतीची दुरवस्था झाल्याने हा दवाखाना बजाजनगरातून पंढरपूर येथे स्थलांतरित करण्यात आला. किमान याठिकाणी तरी चांगले आणि वेळेवर उपचार मिळतील, अशी अपेक्षा कामगारांना होती. मात्र, येथेही कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे हेळसांड सुरूच असल्याने कामगार रुग्णांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दवाखान्याची वेळ आहे. मंगळवारी दुपारी लंचच्या नावाखाली साडेबारापासून दोन ते सव्वादोन वाजेपर्यंत दवाखाना बंद ठेवण्यात आला. त्यामुळे जवळपास ४० रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे या ठिकाणी रुग्णांना बसण्याची सोय नाही. त्यामुळे महिला-परुष रुग्णांना रस्त्यावरच उन्हात ताटकळत बसावे लागते, तर काही रुग्ण दवाखान्यात पायऱ्यांवर दवाखाना उघडण्याची प्रतीक्षा करताना दिसून आले. उपचार मिळणे तर दूरच पण बसायला जागाही मिळत नसल्याने रस्त्यावर बसावे लागत असल्याचा आरोप पंकज इंगोले, इरफान सय्यद, संभाजी शेजूळ, अनिता वाघ, भारती धडे, सीमा वखरे, आदित्य इंगळे, अर्चना इंगळे, विजय राऊत, सखाराम देशमुख, रुस्तुम चापे, शुभम विनोदकर, सचिता कळमकर, मोहन मालोदे आदी रुग्णांनी केला आहे.


या विषयी ईएसआयसी दवाखान्याचे डॉ. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता लंच असल्याने काही काळ दवाखाना बंद होता, असे त्यांनी सांगितले.
फोटो ओळ - ईएसआयसी दवाखाना बंद असल्याने कामगार रुग्णांना दवाखान्याबाहेर ताटकळत बसावे लागले. पहिल्या छायाचित्रात रस्त्यालगत बंद दुकानासमोर, तर दुसºया छायाचित्रात पायऱ्यांवर बसलेले रुग्ण व नातेवाईक.

 

Web Title:  Patients residing in ESIC clinic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.