पँथर काळाच्या पडद्याआड! माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे दीर्घ आजाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 11:38 AM2024-05-04T11:38:12+5:302024-05-04T11:46:26+5:30

उद्या रविवारी सायंकाळी ५ वाजता उस्मानपुरा येथील नागसेन विद्यालय परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Former Minister of State Panther Gangadhar Gade passed away after prolonged illness | पँथर काळाच्या पडद्याआड! माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे दीर्घ आजाराने निधन

पँथर काळाच्या पडद्याआड! माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे दीर्घ आजाराने निधन

छत्रपती संभाजीनगर: पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाचे एक अग्रणी नेते माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७६ वर्ष होते. उद्या रविवारी सायंकाळी ५ वाजता उस्मानपुरा येथील नागसेन विद्यालय परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजी मंत्री गंगाधर गाडे यांचा जन्म १९३९ मध्ये अमरावती जिल्ह्यातील मोरशी तालुक्यातील कवठाळ येथे झाला. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक दलित वसाहती त्यांनी वसवल्या. गंगाधर गाडे हे एक प्रभावशाली दलित नेते होते. त्यांनी दलित हक्कांसाठी अनेक लढे दिले. ते मागील काही वर्षांपासून आजारी होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे साडेचार वाजता उपचारादरम्यान त्यांनी अखेच श्वास घेतला. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव उद्या रविवार ( दि. ५) रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत उस्मानपुरा, पीरबाजार येथील नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धांत गाडे, सून डॉ. भावना वंजारी-गाडे, बहिण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, नातवंडे असा परिवार आहे. 

पँथर विद्यार्थी नेता ते राज्यमंत्री प्रवास
छत्रपती संभाजीनगरमध्ये १९७० च्या दशकात मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेत असताना शिष्यवृत्तीच्या प्रश्नावरून गंगाधर गाडे यांचे विद्यार्थी नेतृत्व उदयाला आले होते. विद्यार्थी नेते म्हणून गंगाधर गाडे यांनी नागसेनवन आणि विद्यापीठात चांगली पकड निर्माण केली होती. मराठवाड्यातील विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या नामांतर आंदोलनाचे अग्रणी नेतृत्व गाडे यांनी केले. पुढे कॉँग्रेस सरकारमध्ये गाडे यांनी राज्यमंत्री पद देण्यात आले. माजीमंत्री गाडे यांनी विद्यार्थी हिताचे अनेक आंदोलने हाती घेऊन ती यशस्वी केली. या दरम्यान अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

गंगाधर गाडे यांच्या निधनाने दलित चळवळीला धक्का- राजेंद्र दर्डा
राज्याचे माजीमंत्री आणि लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी नागसेन विद्यालय परिसरातील गंगाधर गाडे यांच्या निवासस्थानी जाऊन गाडे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सूर्यकांता गाडे, डॉ. सिद्धांत गाडे यांचे सांत्वन राजेंद्र दर्डा यांनी केले. राजेंद्र दर्डा आणि गंगाधर गाडे हे एकाच मंत्रिमंडळात सहकारी म्हणून कार्यरत होते.  तसेच दोघांचाही जन्मदिवस एकाच तारखेला म्हणजे २१ नोव्हेंबरला आहे. गंगाधर गाडे यांच्या जाण्याने दलित चळवळीला मोठा धक्का बसला असून ही हानी भरून न येणारी आहे. गंगाधर गाडे यांचे नामांतर चळवळ तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात विविध नागरी वसाहती वसविण्याचे कार्य मोलाचे आहे, अशा शब्दात राजेंद्र दर्डा यांनी आदरांजली व्यक्त केली.

Web Title: Former Minister of State Panther Gangadhar Gade passed away after prolonged illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.