पतीचे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले; चोंढाळ्याच्या उपसरपंच अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:46 PM2024-01-13T12:46:11+5:302024-01-13T12:47:36+5:30

जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी पैठणच्या तहसीलदारांस प्रत्यक्ष चौकशीचे दिले होते आदेश

Encroachment of husband on government land; Deputy Sarpanch of Chondhala disqualified | पतीचे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले; चोंढाळ्याच्या उपसरपंच अपात्र

पतीचे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले; चोंढाळ्याच्या उपसरपंच अपात्र

विहामांडवा : पतीने शासकीय जमिनीवर केलेल्या अतिक्रमणांमुळे चिंचाळा, चोंढाळा व मिरखेडा (ता. पैठण) या ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच महिलेस पदावरून पायउतार व्हावे लागल्याची घटना घडली. बुधवारी(दि.१०) जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढले. मनीषा मनोहर करताडे असे पदावरून पायउतार झालेल्या महिलेचे नाव आहे.

नऊ सदस्यीय असलेल्या चिंचाळा, चोंढाळा व मिरखेडा या संयुक्त ग्रामपंचायतीची फेब्रुवारी २०२० मध्ये निवडणूक पार पडली. यानंतर चोंढाळा येथील मनीषा मनोहर करताडे या उपसरपंचपदी विराजमान झाल्या. मात्र, त्यांचे पती मनोहर करताडे यांनी शासकीय भूखंड मिळकत क्र.१४९ च्या ३३ बाय ३३ क्षेत्रावर अतिक्रमण केले असून, त्यांना अपात्र करावे, अशी तक्रार माजी सरपंच सतीश काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यादरम्यान तक्रारदार सतीश काळे यांनी अतिक्रमणाबाबतचा ठराव, एकत्र कुटुंबाचा पुरावा म्हणून शिधापत्रिका, अतिक्रमण नोंदवही आदी पुरावे सादर केले.

त्यानुसार जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी पैठणच्या तहसीलदारांस प्रत्यक्ष चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. १४ जुलै २०२३ रोजी पैठणच्या तहसीलदारांनी यासंबंधी आपला अहवाल सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांचा स्पष्ट अभिप्राय, ग्रामपंचायतीचा ठराव, अतिक्रमण नोंदवही आदी पुराव्यांवरून मनीषा करताडे यांना अपात्र ठरवून त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे आदेश बुधवारी (दि.१०) पारित केले.

Web Title: Encroachment of husband on government land; Deputy Sarpanch of Chondhala disqualified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.