खोटी कागदपत्रे बनवून ९ कोटींचे कर्जही लाटले; भाजप पदाधिकारी, जिल्हा बँक संचालकाचा प्रताप

By सुमित डोळे | Published: April 27, 2024 07:27 PM2024-04-27T19:27:31+5:302024-04-27T19:27:57+5:30

आश्चर्यच ! एकाच दिवसात रजिस्ट्री, कर्जही मंजूर, रक्कमही जमा

A loan of 9 crores was also waived by forging documents; BJP activist, District Bank Director arrested | खोटी कागदपत्रे बनवून ९ कोटींचे कर्जही लाटले; भाजप पदाधिकारी, जिल्हा बँक संचालकाचा प्रताप

खोटी कागदपत्रे बनवून ९ कोटींचे कर्जही लाटले; भाजप पदाधिकारी, जिल्हा बँक संचालकाचा प्रताप

छत्रपती संभाजीनगर : समर्थनगरमधील कोट्यवधींची जमीन विकत देण्यास मूळ मालकाने नकार दिल्यानंतर भाजप पदाधिकारी, जिल्हा बँक संचालक तसेच दारू व्यावसायिक अभिषेक जगदीश जैस्वाल (३९, रा. नूतन कॉलनी) याने त्याच जमिनीची खोटी कागदपत्रे तयार केली. रजिस्ट्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीने बोगस खरेदीखत, गहाणखत तयार करून मलकापूर अर्बन बँकेतून ९ कोटी रुपयांचे कर्ज उचलून घोटाळा केला. याप्रकरणी शुक्रवारी रात्री अभिषेकसह त्याची पत्नी श्वेता (३६), मोठा भाऊ अंबरीश (४१), बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मोतीराम सावजी यांच्यासह ७ जणांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेख परवेज अहमद, शेख फुजेल अहमद यांच्या वडिलांच्या नावे सिल्लेखाना समर्थनगर रस्त्यावर २३९५.९४ चौ.मी. जमीन आहे. अहमद कुटुंबीय पुण्यात वास्तव्यास असून अभिषेक अनेक वर्षांपासून ही जमीन विकत घेण्यासाठी प्रयत्नात होता. मात्र, त्यात त्याला यश मिळाले नाही. मलकापूर बँकेचे अधिकारी राजेंद्र जाधव यांच्या तक्रारीनुसार, जैस्वालचे ९ कोटींचे हप्ते थकल्यानंतर सदर जमिनीबाबत जप्तीची नोटीस जारी झाली. त्यानंतर अहमद कुटुंबाने वकिलामार्फत नोटीस पाठवून सदर जमिनीचे मूळ मालक असल्याची कागदपत्रे बँकेला सादर केली. बँकेने निबंधक खात्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर खरेदीखतच खोटे असल्याचे निष्पन्न झाले. जाधव यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सहायक निरीक्षक सय्यद मोहसीन यांनी शुक्रवारी रात्री अभिषेक, अंबरीशला अटक केली.

दारू कंपनी विकत घेण्याचे स्वप्न
-जैस्वालने पुण्यातील विदेशी मद्य निर्मिती कंपनी विकत घेण्यासाठी १२ कोटींच्या कर्जासाठी मलकापूर बँकेकडे २०१८ मध्ये अर्ज केला. त्यासाठी त्याने कंपनीचा परवाना, जागेची माहिती व यंत्र खरेदी कराराची प्रत सादर केली होती. साेबतच समर्थनगरच्या जागेचे खरेदीखत, बँकेच्या आर्किटेक्टचे मूल्यांकन, वकिलाचा सर्च रिपोर्ट, फेर, गहाणखत प्रतीसह विविध कागदपत्रे सादर केली. पत्नी श्वेता व भाऊ अंबरीश त्यासाठी जामीनदार राहिले.

आश्चर्यच ! एकाच दिवसात रजिस्ट्री, कर्जही मंजूर, रक्कमही जमा
जैस्वालने ३१ डिसेंबर, २०१८ रोजीच सदर जमिनीचे खरेदीखत तयार केले. आर्किटेक्टने मूल्यांकन त्याच दिवशी करून सादरही केले. त्याच दिवशी बँकेच्या सीईओने कर्ज मंजूर करून सदर रक्कम वितरित देखील झाली. विशेष म्हणजे, ३१ डिसेंबर रोजीच सहदुय्यम निबंधक कार्यालयाचा जैस्वालचा शेवटचा ऑनलाइन दस्त लिव्ह अँड लायसन्स नोंदवण्यात आला.

हे प्रश्न अनुत्तरीतच ?
-मूळ जमीन दुसऱ्याच्या नावावर असताना रजिस्ट्री कार्यालयातून खोटे खरेदीखत, गहाणखत कसे झाले ?
-जमिनीचा सर्च रिपोर्ट, मूल्यांकनातही हा प्रकार निदर्शनास कसा आला नाही ?
-बँकेचे वरिष्ठ अधिकारी, पॅनलने कोट्यवधींचे कर्ज देताना कुठलीही खातरजमा कशी केली नाही ?

राजकीय चर्चांना उधाण
जैस्वालचे जिल्ह्यात जवळपास ६ वाइनशॉप असून तो भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सिल्लोड विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गुन्हा दाखल होण्याची शक्यता दिसताच जैस्वालने जमिनीबाबत न्यायालयात दावा करून मुंबईला धाव घेतली. मात्र, मुंबईहून परतताच पोलिसांनी दोन्ही भावांच्या मुसक्या आवळल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, बँकेत अशाच प्रकारच्या ८ ते १० कोटींच्या दोन घोटाळ्यांची शक्यता आहे. त्यांची खातरजमा सुरू असून नगरच्या एका बड्या क्रेडिट सोसायटीचा कोट्यवधींचा घोटाळा या गुन्ह्यातूनच उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. न्यायालयाने आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: A loan of 9 crores was also waived by forging documents; BJP activist, District Bank Director arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.