एप्रिल महिन्यातच तलाव आटल्याने जलसंकट भेडसावणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 03:13 PM2024-04-17T15:13:04+5:302024-04-17T15:13:19+5:30

पाणी पातळी खालावली : जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात केवळ ३५ टक्के जलसाठा

The lake will dry up in the month of April itself and will face a water crisis! | एप्रिल महिन्यातच तलाव आटल्याने जलसंकट भेडसावणार!

एप्रिल महिन्यातच तलाव आटल्याने जलसंकट भेडसावणार!

भंडारा : जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्प, ३१ लघु प्रकल्प, २८ मालगुजारी तलाव या सर्व ठिकाणची पाणी पातळी निम्म्यावर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये कडक उन्हाळा सुरू झाल्याने बहुतांशी तलाव आटले असून मोठ्या प्रकल्पातील जलस्तर खालावला आहे. त्यामुळे येत्या दिवसात जलसंकट भेडसावणार आहे. सध्या ४८.४५ दलघमी म्हणजे ३९.७९३ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी ५२.५३ दलघमी म्हणजे ४३.२४० टक्के पाणीसाठा होता.

भंडारा जिल्ह्यात सर्वांत कमी जलसाठा बघेडा जलाशयात ३५.३२४ आहे. तर सर्वांत जास्त जलसाठा सोरना जलाशयात ५५.२२२ टक्के आहे. चारही जलाशयांची पातळी ४८.४६४ टक्के आहे. लघु प्रकल्पांची संख्या ३१ आहे. त्यात कुरमडा, कवलेवाडा, पवनारखारी, अंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली (ता. तुमसर), नागठाणा टांगा, हिवरा (ता. मोहाडी), आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी (ता. भंडारा), वाही, भिवखिडकी, कातुर्डी, पिलांद्री (ता. पवनी), शिवनीबांध, कुंभली, गुढरी (ता. साकोली), सालेबर्डी (ता. लाखांदूर), भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शीपार (ता. लाखनी) या ३१ लघुप्रकल्पांचा समावेश असून येथे १८.६७१ दलघमी म्हणजेच ३४.८७२ टक्के जलसाठा आहे. 

या सर्व जलाशयांचा विचार केल्यास कुरमडा, पवनारखारी, परसवाडा, टांगा, हिवरा, डोडमाझरी, चिखलपहेला, रावणवाडी, कुंभली या जलाशयातील साठा कमालीचा खालावला असून ३० टक्क्यांच्या आत आहे. तर जवळपास १३ प्रकल्पातील जलसाठा ५० टक्क्यांच्या दरम्यान आहे.

चारही मध्यमप्रकल्पातील जलसाठयात घट
भंडारा जिल्ह्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली, सोरना हे ४ मध्यम प्रकल्प आहेत. सध्या या चारही प्रकल्पात ४८.४६४ दलघमी २०.७५० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेत ४५.५७२ टक्के दलघमी १९.५१२ असा उपयुक्त जलसाठा होता.

मालगुजारी तलावात अत्यल्प जलसाठा
जुन्या मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. आजच्या स्थितीत २८ पैकी १३ तलावातील जलसाठा २५ टक्क्यांच्या खाली घसरला आहे. एकोडी, पाथरी, सावरबंध, लवारी, उमरी, सानगडी, केसलवाडा या तलावात फक्त अल्प जलसाठा शिल्लक आहे. प्रखर उन्हाळा सुरू होण्याच्या आधीच या तलावातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. वेळोवेळी झालेल्या अवकाळी पावसाने काही अंशी जलसाठ्यात भर पडली आहे.

Web Title: The lake will dry up in the month of April itself and will face a water crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी