खर्चिक विवाह सोहळ्यांनी वाढतोय कर्जाचा डोंगर !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 02:16 PM2024-05-02T14:16:55+5:302024-05-02T14:20:01+5:30

Bhandara : ग्रामीण भागातही होतोय वारेमाप खर्च; महागाईने वर-वधू पिता त्रस्त

Expensive wedding ceremonies are increasing the amount of debt! | खर्चिक विवाह सोहळ्यांनी वाढतोय कर्जाचा डोंगर !

Weddings are becoming expensive in Villages also

लोकमत न्यूज नेटवर्क 
किटाडी :
सध्या स्थितीत सर्वत्र लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. आता शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही खर्चिक विवाह सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळेलग्न - साहित्याच्या किमतीही गगनाला भिडल्या असून, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरही महागाईचे सावट आहे.

ग्रामीण भागात शेतमजूर कुटुंबांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी दोन पैसे गाठीला जोडावे लागतात; परंतु वाढत चाललेल्या महागाईमुळे, लग्नसोहळ्यातील वाढलेल्या खर्चामुळे अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील विवाह सोहळे कमी खर्चात साध्यासुध्या पद्धतीने पार पाडले जात होते; परंतु हल्ली ग्रामीण भागातही शहरी थाटामाटाची संस्कृती रूढ होत चालली आहे. लग्नसोहळ्यात मेहंदी, हळद, पाहुण्यांचा पाहुणचार, कपडे, स्वागत समारंभ, भेटवस्तू, -म्युझिकल बँडबाजा, डीजे, लाइटिंग, - मोठी एलईडी स्क्रीन व शेवटी मांडव वाढवणी आदी कार्यक्रमांसह खर्चाची यादी वाढली आहे.

याशिवाय घोडा, केटरर्स, फेटे, फ्लावर डेकोरेशन, व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी, ड्रोन कॅमेरा, शूटिंग खर्च एकूण गोळाबेरीज केली तर खर्च लाखोंच्या घरात जातो. त्यामुळे ते थाटामाटात आणि अगदी वाजत- गाजतच वेगळ्या पद्धतीने झाले पाहिजे, असा आताच्या तरुण पिढीचा आग्रह घरच्यांसमोर असतो. त्यामुळे सर्वसाधारण घरातील लग्नाचे बजेट वाढत चालले आहे. शहरात होणाऱ्या महागड्या लग्नासारखी लग्न अलीकडे ग्रामीण भागातही व्हायला सुरुवात झाली आहे. परिणामी, आई-वडिलांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.


सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज
अलीकडे अनेक धार्मिक, सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकीतून सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजन करतात. सर्वांचा खर्च, वेळ, पैसा व श्रम यांची तर बचत होतेच. शिवाय, सामाजिक संस्थांकडून विवाहित जोडप्यांना संसाराकरिता आवश्यक साहित्यही दिले जाते. गोरगरीब, शेतकरी व सर्वसाधारण पालकांना सामूहिक विवाह सोहळ्यामुळे मोठी मदत होते. आर्थिक कर्जबाजारीपणातून वाचण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याला पसंती देणे, हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

अनावश्यक खर्चाला फाटा द्यावा
दुष्काळी स्थितीतही ग्रामीण भागात लग्नसमारंभातील मिजास कायम असल्याचे दिसून येते. प्रसंगी कर्जबाजारी होऊन वर-वधू पिता धुमधडाक्यात विवाह सोहळा साजरे करीत असल्याचे दिसते. लग्नातील हा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. शेवटी लग्न दोन जीव व दोन कुटुंबाचे मिलन असते. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून काही पैसा भावी दाम्पत्याच्या भविष्यासाठी राखून ठेवणे, अधिक सोयिस्कर ठरू शकेल.
 

Web Title: Expensive wedding ceremonies are increasing the amount of debt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.