कोल्हापूरमधील उसाच्या फडातील मुलांची बीडमध्ये हजेरी; बोगस हजेरीपट दाखवून घोटाळा?

By सोमनाथ खताळ | Published: March 26, 2024 12:08 PM2024-03-26T12:08:35+5:302024-03-26T12:09:52+5:30

शिक्षण विभागाकडून दिशाभूल, तपासणीतून धक्कादायक प्रकार उघड

Attendance of sugarcane field children in beed in Kolhapur; Scam by showing bogus attendance? | कोल्हापूरमधील उसाच्या फडातील मुलांची बीडमध्ये हजेरी; बोगस हजेरीपट दाखवून घोटाळा?

कोल्हापूरमधील उसाच्या फडातील मुलांची बीडमध्ये हजेरी; बोगस हजेरीपट दाखवून घोटाळा?

बीड : कोल्हापूरच्या 'अवनी' संस्थेने सर्वेक्षण केले. यात बीड जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील १८३९ मुले हे कोल्हापूरच्या वेगवेगळ्या ११ कारखान्यांवर ऊसतोडणी काम करणाऱ्या पालकांसोबत असल्याचे उघड झाले होते. त्याची यादी बीड शिक्षण विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्त्वशील कांबळे आणि जागर प्रतिष्ठानचे अशोक तांगडे यांना पाठवली. त्यांनी उलट तपासणी केली या मुलांची बीडमधील शाळेच्या हजेरीपटावर उपस्थिती दिसून येत आहे. केवळ पटसंख्या दाखविण्यासाठी आणि आहाराचा 'मलिदा' लाटण्यासाठीच हा खटाटोप केल्याचे उघड झाले आहे. 

चौकशी करून शिक्षण विभागाने केलेल्या या दिशाभूल विरोधात शासन कारवाई करणार का? हे वेळच ठरवणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील व शिक्षणाधिकारी भगवान फुलारे यांना भ्रमणध्वणीवरून संपर्क साधला, परंतु दोघांनीही फोन न घेतल्याने बाजू समजली नाही.

बोगस हजेरीपट दाखवून घोटाळा?
जिल्ह्यातील ८ लाख कामगार राज्यासह परराज्यात ऊसतोडणीला जातात. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी समग्र शिक्षाअंतर्गत २२० हंगामी वसतिगृह सुरू केली. यात २१ हजार ४९० मुले असल्याचा दावा बीडचा शिक्षण विभाग करत आहे. परंतु, उलट तपासणीत अनेक मुलांची हजेरी बोगस दाखवून वसतिगृह चालविणाऱ्यांनी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे दिसून येत आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

कोठे काय आढळले?
अवनी संस्थेने पाठविलेल्या यादीतील मुलांच्या शाळेत जाऊन तपासणी करण्यात आली. बीड तालुक्यातील दोन व शहरातील एक अशा तीन शाळांना तत्त्वशील कांबळे व त्यांच्या पथकाने भेटी दिल्या. यात मुलांची नियमित हजेरी असल्याचे उघड झाले आहे. वास्तविक पाहता हे मुले कोल्हापूरमध्ये पालकांसोबत होते. तसेच, उपस्थिती दाखविलेल्या मुलांबाबत विचारणार केल्यावर ते आज आले नाहीत, असे उत्तर मुख्याध्यापकांकडून देण्यात आले. आपले पितळ उघडे पडू नये, यासाठी कालची हजेरी आज याप्रमाणे भरली जात आहे. जरी कोणी विचारले तरी आज आले नाहीत, असे सांगितले जात आहे.

शिक्षणविभागातील अधिकाऱ्यांचा असू शकतो सहभाग
अवनी संस्थेने पाठविलेल्या यादीची उलट तपासणी केली. तीन शाळांना भेटी दिल्या. या ठिकाणी एकही विद्यार्थी हजर नव्हता परंतु त्यांची उपस्थिती नियमित होती. मुख्याध्यापकांना विचारणा केल्यावर बोलण्यास नकार दिला. ही केवळ शासनाची दिशाभूल आहे. पटसंख्या दाखविण्यासाठी आहारात घोटाळा करण्यासाठीचा खटाटोप आहे. यात शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असू शकतो.
- तत्त्वशील कांबळे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान, बीड

अवनी संस्थेने काय केले ?
कारखान्यांना भेटी - ११
कुटुंब संख्या - १९५८
एकूण मुले - १८३९

किती मुले आढळली?
० ते ३ वयोगट - ३३५
४ ते ६ वयोगट - ३५३
७ ते १४ वयोगट - ६५३
१५ ते १८ वयोगट - ४९८

Web Title: Attendance of sugarcane field children in beed in Kolhapur; Scam by showing bogus attendance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.