मेळघाटातील ११० दुर्गम गावांमध्ये एकदाही लालपरीची घंटी वाजली नाही!

By जितेंद्र दखने | Published: May 8, 2024 10:38 PM2024-05-08T22:38:04+5:302024-05-08T22:38:32+5:30

रस्ते, दळणवळणाच्या सुविधांपासून दूरच

In 110 remote villages of Melghat, Lalpari's bell did not ring even once! | मेळघाटातील ११० दुर्गम गावांमध्ये एकदाही लालपरीची घंटी वाजली नाही!

मेळघाटातील ११० दुर्गम गावांमध्ये एकदाही लालपरीची घंटी वाजली नाही!

जितेंद्र दखने, अमरावती: देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मेळघाटवासीयांनी जिल्ह्यात सर्वाधिक ७९.५५ टक्के मतदान केले. येथील विकासाच्या मोठ्या गोष्टी केल्या जातात. मात्र, मेळघाटवासीयांच्या नशिबी व्याघ्र प्रकल्पासह कठोर वन कायद्यांमुळे अनेक सुविधांचा लाभ नाही. मजबूत रस्ते, नेट कनेक्टिव्हिटी, वीज नसल्याने मेळघाटातील ११० दुर्गम गावांपर्यंत अद्यापही एसटी बसचे दर्शन घडले नाही. परिणामी येथील आदिवासींना जंगली श्वापदांचा धोका पत्करून, वेळ व पैसा खर्च करून कधी पायी, कधी सायकलने, कधी खासगी वाहनांनी ५ ते १० किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या बसस्थानकांपर्यंत प्रवास करावा लागत आहे. दुर्गम भागात रस्ते तयार करण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. कारण, हा भाग व्याघ्र प्रकल्पात येतो.

वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका असल्यामुळे रस्ते कामासाठी परवानगी मिळत नाही. ही किचकट व दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. पहाड, डोंगर, दऱ्या, नदी, नाले, जंगल भाग येथे असल्यामुळे मजबूत रस्ते नसतील, तर धोकादायक रस्त्यांवर एसटीही रस्त्यांवर धावू शकत नाही. यासाठी किमान चांगले रस्ते, पूल, सुरक्षित वळणे असणे आवश्यक आहे. एसटीद्वारे अंतर्गत भागात सर्वेक्षण केल्यानंतर १०० पेक्षा अधिक दुर्गम गावांपर्यंत जाण्यासाठी रस्तेच नसून तेथे लहान वाहन कसेतरी पोहोचू शकते, अशी स्थिती असल्याचे एसटी निरीक्षकांना आढळले. त्यामुळे या गावांमध्ये एसटी बस सेवा सुरू करता आली नसल्याचे एसटी विभाग नियंत्रक कार्यालयाद्वारे सांगण्यात आले.

दळणवळणाच्या सुविधांअभावी मेळाघाटातील अनेक गावात ना एसटी बस, ना मोबाइल कनेक्टिव्हिटी, ना वीज अशी येथील दुर्गम भागातील गावांची स्थिती आहे. मेळघाटातील चिखलदरा, धारणी तालुक्यापर्यंत एसटीची सेवा आहे. या मार्गावर जी गावे आहेत. तिथवर एसटीची सेवा आहे. परंतु, मुख्य रस्त्यापासून तीन ते पाच किलोमीटर आत तसेच १० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांपर्यंत रस्तेच नसल्याने तेथे एसटी पोहोचू शकत नाही. तेथील नागरिक सायकल किंवा इतर वाहनांनी बस थांब्यापर्यंत येतात.

अडचणीमुळे कामे शक्य नाही

मेळघाटात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा हवा तसा फायदा नाही. कारण, मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह वन कायद्यामुळे येथील रस्त्यांचे स्वरूप बदलणे शक्य नाही. त्यासाठी परवानगीच मिळत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे हात बांधले आहेत. येथील रस्ते आधीपासूनच माती, मुरुम, खडीचे असतील तर ते बदलता येत नाहीत. त्यामुळे खरी अडचण असून रस्त्याअभावी एसटी दुर्गम भागात पोहोचत नाही.

सर्वेक्षण केल्यानंतर मेळघाटातील अंतर्गत भागात रस्ते, वळण चांगले नसल्याचे आढळले. तेथून चारचाकी व्यवस्थित जात नाही. गावे फारच आत अशा रस्त्याने एसटीची वाहतूक करणे शक्य नाही. काही आहेत तिथपर्यंत एसटी घेऊन जाणे कठीण असल्यामुळे तेथे एसटी बस जात नाही.
- प्रवीण काळमेघ, वाहतूक निरीक्षक, एसटी महामंडळ अमरावती

Web Title: In 110 remote villages of Melghat, Lalpari's bell did not ring even once!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.