सातवीपर्यंत शाळा असलेल्या गावाची कीर्ती सातासमुद्रापार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 12:29 PM2024-05-02T12:29:11+5:302024-05-02T12:34:02+5:30

Amravati : भगवान गौतम बुद्धांचे डोळे उघडे असलेले शिल्प तयार करणाऱ्या अमोलची शिल्पकला चर्चेचा विषय

Aashtgaon the village with a school up to class 7 is spread across the world | सातवीपर्यंत शाळा असलेल्या गावाची कीर्ती सातासमुद्रापार

Amol Ingle showing his sculptures

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी :
भगवान गौतम बुद्धांचे डोळे उघडे असलेले शिल्प तयार करण्याची कामगिरी अमोल शिकत असलेल्या महाविद्यालयाने दिली होती. वास्तविक, आतापर्यंत ध्यानस्थ बुद्धांची अनेक रूपे आपण पाहिली. त्यामुळे हे आव्हानच होते. ती लीलया पेलत अमोलने सुबक बुद्ध शिल्प घडविले. संस्थेने या कामगिरीसाठी त्याला पुरस्कार म्हणून रक्कम दिली. त्यानंतर अमोलने मागे वळून पाहिले नाही. अनेक शिल्पे त्याच्या हातून घडली आहेत. त्यामुळे मोर्शी तालुक्यातील आष्टगावदेखील पुन्हा नावारूपास आले.

जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा असलेले आष्टगाव ही कलाकारांची जननी. गझल नवाज भीमराव पांचाळे, पहिल्यांदा मोबाइलने शॉर्ट फिल्म बनविणारे आसिफ खान, चित्रकार सावळाराम तडस यांच्यानंतर अमोल इंगळे या शिल्पकाराने या गावाची ओळख जगाला करून दिली. सातवीनंतर कोकर्डा येथील सर्वोदय हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना चित्रकला शिक्षक राऊत यांच्यामुळे तो चित्रकलेकडे ओढला गेला. या क्षेत्रात करिअर करण्याचे मानस गावातील समीर पटेल यांना सांगितल्यावर ते त्याला अमरावतीच्या शिवाजी चित्रकला महाविद्यालयात घेऊन गेले. फाउंडेशन अभ्यासक्रमानंतर खामगाव येथील एका खासगी चित्रकला महाविद्यालयात शिल्पकला अभ्यासक्रम पूर्ण केला. 

मुंबई शहरात भीमराव पांचाळे यांनी अमोलला एका चित्रपटाकरिता शिल्पकृती तयार करून देण्याचे व्यावसायिक स्वरूपाचे पहिले काम मिळवून दिले. मात्र, पैसा मिळतो; पण स्वतःची ओळख निर्माण होत नाही, हे पाहता त्यांनी दोन वर्षांत मुंबईवरून थेट आष्टगाव गाठले. मुंबईला कार्यरत असताना त्यांच्या शिल्पकृती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर पसरल्या होत्या. त्यामुळे त्यांना गावातही काम मिळणे सोयीचे झाले. बडनेरा येथील शिवाजी महाराजांचे शिल्प, अमरावती येथील एका हॉटेलच्या प्रवेशद्वारावरील शिल्पाकृती, गावातील वाचनालयात असलेले स्व. सुरेश भट यांचे शिल्प, याशिवाय अनेक घरे, प्रतिष्ठानांत अमोल यांनी तयार केलेली शिल्पकृती विराजमान आहे.
 

Web Title: Aashtgaon the village with a school up to class 7 is spread across the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.