"मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करा अन्यथा...", आमदार सरनाईकांचा इशारा

By धीरज परब | Published: April 27, 2024 07:22 PM2024-04-27T19:22:38+5:302024-04-27T19:23:03+5:30

पालिकेने व एमएमआरडीएने अनेक सिमेंट रस्त्यांची कामे चालवली आहेत.

Finish the road works by the end of May warned MLA pratap Sarnaik | "मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करा अन्यथा...", आमदार सरनाईकांचा इशारा

"मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करा अन्यथा...", आमदार सरनाईकांचा इशारा

मीरारोड- मीरा भाईंदर पालिकेचे योग्य नियोजन आणि समन्वय नसल्याने शहरात सुरु असणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे संथ गतीने सुरु असून त्यातून वाहतूक कोंडी व रहदारीला त्रास होत आहे. त्यामुळे स्वतः आयुक्तांनी लक्ष घालून मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण करावी असे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. 

मीरा भाईंदर शहराला खड्डे मुक्त करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीने शहरात एमएमआरडीए आणि पालिकेच्या माध्यमातून काँक्रीट रस्ते बांधण्याचे काम सुरु झाले आहे. काँक्रीट रस्त्याच्या कामांसाठी शासना कडून निधी मंजूर करतानाच पालिकेला कर्ज घेता यावे म्हणून त्याला सुद्धा मंजुरी आणून दिली आहे. 

पालिकेने व एमएमआरडीएने अनेक सिमेंट रस्त्यांची कामे चालवली आहेत. परंतु सिमेंट रस्ते बनवण्यासाठी आधीचे रस्ते खोदकाम करताना आतील जलवाहिन्या, नळ जोडण्या, वीज केबल, गॅस पाईप लाईन, एमटीएनएल सह अन्य फायबर केबल आदी असल्याने त्याची शिफ्टिंग रस्त्याच्या कडेला करणे आवश्यक आहे. 

परंतु सदर कामे करताना पालिकेचे नियोजन नाही आणि संबंधित विविध विभागां मध्ये समन्वय न ठेवल्याने तसेच कामे वेगाने होत नसल्याने सिमेंट रस्त्यांची कामे संथ गतीने सुरु आहेत. अनेक भागात तर रस्ते खोदून ठेवले आहेत व काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकी कोंडी सह रहदारीला अडथळे सहन करावे लागत आहेत. धुळीचे साम्राज्य पसरल्याने लोकांना आरोग्याची समस्या भेडसावत आहे. जनता नाराज असताना व पावसाळा दीड महिन्यावर येऊन ठेपला असतानाही महापालिका प्रशासनाला गांभीर्य दिसत नाही.

एमएमआरडीएच्या रस्त्यांची कामे पालिकेच्या कामांच्या तुलनेत वेगाने होत आहेत . पावसाळ्याच्या आधी कामे पूर्ण करण्याबाबत महापालिकेचे कोणतेही ठोस नियोजन दिसत नाही. त्यामुळे रस्त्यांची सध्या सुरु असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील की नाही याबाबत शंका आहे. ‘सखोल स्वछता मोहीम’ राबवून वेळोवेळी रस्त्यावरील धुळीचे साम्राज्य दूर व्हावे, रस्ते स्वच्छ राहावेत म्हणून रस्ते पाण्याने धुण्यात यावेत हे मुख्यमंत्र्यांचे आदेशही महापालिकेने पाळलेले नाहीत.

शहरातील सर्व प्रमुख रस्ते हे दर्जेदार व सिमेंट काँक्रीटचे करण्याचा शब्द  मुख्यमंत्री व स्थानिक आमदार म्हणून मी तसेच राज्यातील शिवसेना -भाजप- राष्ट्रवादी महायुती सरकारने मीरा भाईंदरच्या जनतेला दिला आहे. खड्डेमुक्त शहर करण्याचा शब्द दिला असताना महापालिका प्रशासन सर्व कामात विलंब-दिरंगाई करून त्याला हरताळ फासत आहे.

मुख्यमंत्री यांनी स्वतः रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करा असे सूचित करून देखील मुख्यमंत्र्यांच्या आदेशांकडे ही दुर्लक्ष केले जात आहे. संथ गतीने सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे जनतेतील रोष वाढत असून त्याचा आम्हाला लोकसभा , विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो असे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

एकूणच महापालिका प्रशासनाचा कासव गतीने सुरु असलेला कारभार पाहता आपण गंभीरपणे पावले टाकली नाहीत तर आपल्या या कारभाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करावी लागेल असा इशारा देखील आ. सरनाईक यांनी आयुक्त संजय काटकर यांना दिला आहे. 

Web Title: Finish the road works by the end of May warned MLA pratap Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.