वाई हत्याकांडाची संख्या सहापेक्षा जास्त

By Admin | Published: August 16, 2016 11:21 PM2016-08-16T23:21:18+5:302016-08-17T00:07:14+5:30

डॉक्टर बनला कसाई : चार मृतदेहांचे सापळे सापडले; बाकीच्या बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू

The number of wounded killings is more than six | वाई हत्याकांडाची संख्या सहापेक्षा जास्त

वाई हत्याकांडाची संख्या सहापेक्षा जास्त

googlenewsNext

वाई : एक खून पचल्यानंतर चटावलेल्या डॉ.  संतोष पोळने एकापाठोपाठ तब्बल सहाजणांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक कबुली दिली असून, त्याने दाखविलेल्या शेतातून चार मृतदेहांचे सापळे उकरून काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे वाई तालुक्यात आतापर्यंत जेवढ्या व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत, त्यांच्या नातेवाइकांनीही आता संतोष पोळवरच संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे वाई हत्याकांडाचा आकडा सहापेक्षाही जास्त असण्याची शक्यता बळावली असून, पोलिस खाते त्या दृष्टीने तपास करीत आहे.
पोलिस तपासात संतोष पोळ पोपटासारखा बोलत गेला. गेल्या तेरा वर्षांत त्याने एकूण सहाजणांचा खून केल्याचे कबूल केल्यानंतर पोलिस खातेही जाम हादरले. त्याच्या पोल्ट्री फार्म हाऊसवर ज्या ठिकाणी मंगल जेधे यांचा मृतदेह पुरला होता, त्याच्या शेजारीच आणखी तीन महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह त्याच पद्धतीने पुरून ठेवल्याचे पोळने पोलिसांना दाखविले. त्यानुसार सोमवारी सलमा शेख, जगाबाई पोळ, सुरेखा चिकणे, नथमल भंडारी या चौघांच्या मृतदेहांचे सापळे पोलिसांनी उकरून काढले. मात्र, धोम धरणाच्या खालच्या कृष्णा नदीच्या पात्रात फेकून दिलेल्या वनिता गायकवाड यांचा अद्याप मृतदेह सापडला नाही. हे सर्व लोक २००३ पासून संतोष पोळच्या संपर्कात होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे. हे सर्व पुरलेले मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले असून, केवळ हाडांचे सापळेच उरले आहेत. (प्रतिनिधी)


आणखी दोन खड्डे !
संतोष पोळने त्याच्या फार्म हाऊसवर आणखी दोन खड्डे खणल्याचे मंगळवारी पोलिस तपासात उघडकीस आले. त्यामध्ये त्याची प्रेयसी ज्योती मांढरे हिचाही तो खून करणार होता. ‘तुझ्या अंगावर व्रण उठले असून, इजेंक्शन दिल्यानंतर ते निघून जातील,’ असे तो तिला सांगत होता. मात्र, तिचा गेम करण्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी निर्भया कार्यक्रमात दिली. परंतु दुसरा खड्डा त्याने कोणासाठी खणून ठेवला होता, याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही.


संतोष पोळ हा बोगस डॉक्टरच
साताऱ्यातील एका महाविद्यालयातून १९९६ मध्ये वैद्यकीय पदवी घेतल्याचे संतोष पोळ हा एकीकडे पोलिसांना सांगत असला तरी ते महाविद्यालय २००६ मध्ये सुरू झाले आहे. त्यामुळे त्याने कोणत्याही महाविद्यालयातून डॉक्टरकीची अधिकृत पदवी घेतली नसून, तो बोगस डॉक्टरच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने आतापर्यंत ज्या-ज्या हॉस्पिटलमध्ये काम केले आहे, त्या ठिकाणीही पोलिस संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहेत

‘लोकमत’ने व्यक्त केली होती शक्यता
मंगल जेधे यांच्या खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ‘वाई तालुक्यातून आणखी चार महिला बेपत्ता’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने अजून एक धक्कादायक शक्यता व्यक्त केली होती.
‘या चारजणींच्या बेपत्ता होण्यामागे संतोष पोळच कारणीभूत असावा,’ अशी शक्यताही ‘लोकमत’ने वर्तविल्यानंतर पोलिस यंत्रणाही त्या दृष्टीने अधिक सतर्क झाली होती. .

पोलिस अधिकाऱ्याच्या अपघाती मृत्यूचाही शोध
वाई येथील तत्कालीन पोलिस उप निरीक्षक राजेश नाईक यांनी संतोष पोळच्या कारनाम्याची चौकशी सुरू केली होती. मात्र, त्यावेळी त्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. दरम्यान, त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. मात्र, अद्यापपर्यंत ते वाहन पोलिसांना सापडले नाही. हा अपघात घडला त्यावेळी नाईक यांच्या घातपाताचीही शक्यता वर्तविण्यात येत होती. डॉक्टर पोळने केलेली कृत्य एकापाठोपाठ एक उघडकीस येत असल्याने राजेश नाईक यांच्या अपघाताचीही चौकशी पोलिस खात्याने सुरू केली आहे.


खुनाची तारीख निश्चित झाल्यानंतर एक महिना अगोदरच डॉक्टर शेतात खड्डा खणून घ्यायचा.
पहिला खून आर्थिक कारणातून; त्यानंतर ही माहिती समजल्यामुळे बाकीच्यांनाही शांतपणे संपविले.
स्कोलीन नामक भुलीचे औषध देऊन सहाहीजणांची केली होती डॉक्टरने हत्या.
या हत्याकांडाचे पुरावे गोळा करण्यासाठी जिल्ह्यातील सहा पोलिसांचे विशेष पथक स्थापन.
करून काढलेल्या चारही सापळ्यांच्या डीएनएची चाचणी होणार.
आणखी दोन बेपत्ता महिलांच्या तपासावर पोलिसांचा भर.

कोल्ड ब्लडेड सीरियल किलर - हॅलो १

Web Title: The number of wounded killings is more than six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.