मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 07:24 PM2024-05-08T19:24:12+5:302024-05-08T19:26:12+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच उद्योगपती अदानी-अंबानी या विषयावर जाहीरपणे भाष्य केले.

Congress leader Rahul Gandhi has criticized Prime Minister Narendra Modi over Mukesh Ambani and Gautam Adani  | मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका

मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi On PM Narendra Modi : तेलंगणातील एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच उद्योगपती अदानी-अंबानी या विषयावर जाहीरपणे भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अदानी आणि अंबानी यांचा दाखला देत काँग्रेसवर टीका केली. विरोधक आता अदानी-अंबानी या विषयावर का बोलत नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोदींच्या या विधानावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका करत खोचक टोला लगावला आहे. मोदींनी सांगितले होते की, पाच वर्षे राजपुत्र अदानी-अंबानींच्या माळा जपायचे, त्यांच्यावर टीका करायचे. पण जेव्हापासून निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून त्यांनी त्यांची नावे घेणे बंद केले आहे.

मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राहुल गांधींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. "मोदीजी थोडे घाबरला आहात काय? तुम्ही बंद खोलीत अदानी-अंबानी यांच्याविषयी चर्चा करायचा. पण, आता प्रथमच जाहीर सभेत अदानी-अंबानी या विषयाला हात घातला. ते टेम्पोमध्ये पैसे देतात हे देखील तुम्हाला माहिती आहे. हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? एक काम करा सीबीआय आणि ईडीला त्यांच्याकडे पाठवा... सगळी माहिती घ्या. मी पुन्हा एकदा देशाला सांगतो की, जेवढा पैसा मोदींनी अदानी-अंबानी यांना दिला आहे, तितकेच पैसे आम्ही हिंदुस्तानातील गरिबांना देऊ. त्यांनी २२ अरबपती बनवले... महालक्ष्मी योजना, पहिली नोकरी पक्की योजना, या योजनांच्या माध्यमातून आम्ही कोट्यवधींना लखपती बनवू", अशा शब्दांत राहुल यांनी मोदींचा समाचार घेतला. 

दरम्यान, तेलंगणातील करीमनगर येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला विचारले की, लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून अंबानी आणि अदानी यांची नावे घेणे का थांबवले? काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी त्या उद्योगपतींकडून किती पैसे मिळाले आहेत. गेली ५ वर्षे काँग्रेसचे राजपुत्र सकाळी उठल्यापासून या उद्योगपतींच्या नावाने माळ जपत होते. पाच वर्षे एकच जपमाळ जपत होते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदी आणखी म्हणाले की, निवडणुका जाहीर झाल्यापासून विरोधकांनी अंबानी आणि अदानींना शिव्या देणे बंद केले आहे. आज मला तेलंगणाच्या भूमीवरून काँग्रेसच्या राजपुत्राला विचारायचे आहे की, त्यांना अदानी आणि अंबानींकडून किती संपत्ती मिळाली? काळ्या पैशाने भरलेली पोती मिळाली का? अंबानी आणि अदानींना शिव्या देणे रातोरात थांबवले असा कोणता व्यवहार झाला? नक्कीच काहीतरी गडबड आहे. 

Web Title: Congress leader Rahul Gandhi has criticized Prime Minister Narendra Modi over Mukesh Ambani and Gautam Adani 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.