मीडिया प्लॅनर - लाखो लोकांच्या मनात शिरणारी एक पायवाट

By admin | Published: May 30, 2014 10:55 AM2014-05-30T10:55:00+5:302014-05-30T10:55:00+5:30

इलेक्शन संपलं. निकाल लागले. नवीन सरकार आलं. सगळं झालं, पण या सार्‍या गदारोळात तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल?

Media Planner - A Trail Inspired by millions of people | मीडिया प्लॅनर - लाखो लोकांच्या मनात शिरणारी एक पायवाट

मीडिया प्लॅनर - लाखो लोकांच्या मनात शिरणारी एक पायवाट

Next
>माध्यमांचा उत्तम वापर करून इमेज ‘घडवण्याचं’ एक नवं कॉर्पोरेट कौशल्य
 
इलेक्शन संपलं. निकाल लागले. नवीन सरकार आलं. सगळं झालं, पण या सार्‍या गदारोळात तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल?
‘अब की बार मोदी सरकार?’ ही कॅप्शन कुणाला सुचली असेल? मोदींचं फेसबुक, त्यांच्या मुलाखती, त्यांची मीडिया इमेज हे सारं कुणी प्लॅन केलं असेल?
निकालानंतर राहुल गांधी त्यांच्या मीडिया प्लॅनरवर का चिडले? त्यांचं प्लॅनिंग का फसलं?
काही कोटी रुपये यावेळेसच्या निवडणुकांत ‘मीडिया इमेज’साठी खर्ची पडले, त्या कामाची कंत्राटं दिली गेली. कुणाची मीडिया इमेज कशी घडेल-बिघडेल या सार्‍यावर बरीच खलबतं झाली.
गेले काही दिवस हे सारं बातम्यात वाचताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कोण असतात हे मीडिया प्लॅनर? 
मोदींची प्रतिमा ज्यांनी भारतीय जनमानसात रुजवली, लार्जर दॅन लाईफ केली त्या मीडिया प्लॅनरची फौज कुठून आली?
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या निवडणुका ऑनलाइन कॅम्पेनच्या जोरावर जिंकल्या, त्यांचं मीडिया प्लॅनिंग अनेक तरुण मुलांनी केलं, ते कोण होते?
मुख्य म्हणजे एकाएकी ‘मीडिया प्लॅनिंग’ आणि ‘मीडिया प्लॅनर’ हे शब्द सुपरहिट झाले. आता तर एक मोठं करिअर म्हणूनच या कामाचा उदय होतो आहे.
 
मीडिया प्लॅनर कोण असतात?
क्रिएटिव्ह डोक्याची पण जनसामान्यांची नस अचूक पकडणारी ही माणसं. सध्या कार्यरत असलेल्या अनेकांनी आधी बर्‍याच जाहिरात एजन्सीत आणि वृत्तपत्रांत काम केलेलं आहे. त्यांना जाहिरातीच्या कॉप्या लिहिता येतात. त्यांना एक से एक कल्पना सुचतात. त्यांना सामान्य माणसाला स्वप्नंही विकता येतात.
मात्र एवढय़ावरच आता त्यांचं काम थांबत नाही. ज्या व्यक्तीसाठी ते मीडिया प्लानिंग करतात त्या व्यक्तीची मीडियातली आत्ताची इमेज काय आहे, ती कशी बदलायची, सुधरवायची, कुठल्या मुलाखतीत काय बोलायचं, कधी बोलायचं, जाहिराती कशा प्रकारच्या हव्यात, त्या वर्तमानपत्रात कधी याव्यात, टीव्हीवर कुठल्या स्लॉटमध्ये दिसाव्यात, चर्चेत राहण्यासाठी काय करावं, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अँप ही साधनं कशी वापरावीत? त्यावरून प्रचार प्रसार कसा करावा, कुठल्या भाषेत केला तर तो अधिक परिणामकारक होईल या सगळ्याचा ही माणसं बारकाईनं अभ्यास करतात. त्याचं नियोजनही करतात. त्यालाच म्हणतात मीडिया प्लॅनिंग.
आता या मीडिया प्लानिंग करणार्‍या काही संस्थाही सुरू झाल्या आहेत. त्यात डिजिटल टीम, क्रिएटिव्ह टीम, स्ट्रॅटेजिक प्लॉनिंग टीम, ट्रॅडिशनल मीडिया टीम आणि पैशाचे व्यवहार सांभाळणारी अकाउण्ट, एचआर टीम अशी बरीच मोठी फौज काम करते.
काही मीडिया प्लॅनर्स हे इव्हेण्ट ऑर्गनायझरही असतात. काही बाहेरच्या इव्हेण्ट मॅनेजमेण्ट एक्स्पर्टची मदत घेतात. आणि मोठमोठे इव्हेंट आयोजित करतात. मोठाल्या सभा, रोड शो ही सारी त्याचीच उदाहरणं.
 
मीडिया प्लॅनर व्हायचं तर काय हवं?
१) ज्याचा क्रिएटिव्ह भेजा सुपरफास्ट चालतो असा कुणीही खरं तर (जेमतेम ग्रॅज्युएट) मीडिया प्लॅनर होऊ शकतो.
२) इंग्रजी चांगलंच हवं. हिंदी-मराठी जेवढय़ा भाषा येतील तेवढय़ा उत्तम.
३) राजकारण, समाजकारण, मार्केटिंग आणि बिझनेस या चारी गोष्टी घोटून अंगी मुरलेल्या हव्यात.
४) उत्तम संवादकौशल्य तर हवंच, म्हणजे कुळीथ काय दगड विकायला बसवलं तरी सोन्याच्या भावात विकता आले पाहिजेत.
५) तंत्रज्ञानाचा लळा पाहिजे. सगळी अत्याधुनिक सोशल नेटवर्किंगची साधनं त्यांच्या ताकदीप्रमाणं उत्तम वापरता आली पाहिजेत.
 
प्रशिक्षण कुठे ?
१) आजच्या घडीला कुठंच मीडिया प्लॅनरसाठीचे कोर्सेस सुरू नाहीत. ( तशी कुणी जाहिरात करत असेल तर त्याला भुलू नका.)   
२) हे पूर्णत: नवीन काम, केवळ स्कीलच्या जोरावरच शिकता येतं.   
३) फार तर पत्रकारितेची पदवी, जाहिरातीची पदवी, मार्केटिंगमधलं एमबीए, मास मीडियाचा अभ्यास हे सारं गाठीशी बांधून या क्षेत्रात शिरकाव करणं शक्य आहे.   
४) पण त्यासाठी शोधाशोध करून हातपाय स्वत:लाच मारावे लागतील.

Web Title: Media Planner - A Trail Inspired by millions of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.