'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 08:40 PM2024-04-27T20:40:05+5:302024-04-27T20:40:59+5:30

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात थेट लढत होणार आहे.

Senior lawyer Ujjwal Nikam has announced his candidacy from Mumbai North Central Lok Sabha constituency and Ashish Shelar has expressed his confidence of victory  | 'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार

'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार

भाजपने धक्कातंत्र देत मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मोठ्या कालावधीपासून भारतीय जनता पक्ष या जागेसाठी उमेदवाराची चाचपणी करत होता. उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर केल्याने पूनम महाजन यांचे तिकीट कापले गेले आहे. भाजपने १५ वी उमेदवार यादी जाहीर केली असून यामध्ये केवळ निकम यांच्या नावाचा उल्लेख आहे. दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा देणाऱ्या निकम यांना भाजपाने उमेदवार घोषित करून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. यावरून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी 'मुंबईचे योद्धे संसदेत जाणार' अशी प्रतिक्रिया दिली. 

आशिष शेलार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उज्ज्वल निकम यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मुंबईचे योद्धे संसदेत जाणार... १९९३ मुंबई बॉम्बस्फोट घडवून मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या याकूबसह अन्य दहशतवाद्यांना तसेच मुंबईवर दहशतवादी हल्ला करून या देशावरच हल्ला चढवणाऱ्या अजमल कसाबला फाशीची शिक्षा होईपर्यत कायदेशीर कडवा संघर्ष करणारे 'मुंबईकरांचे योद्धे' पद्मश्री अ‍ॅड उज्ज्वल निकम यांना भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला आहे. 

'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार - शेलार 
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुंबईकरांचा असलेला प्रचंड विश्वास... विद्यमान खासदार पुनमताई महाजन यांनी केलेले काम आणि भाजपाचे मजबूत संघटन या जोरावर... उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून 'मुंबईचे योद्धे' अ‍ॅड उज्ज्वल निकम मुंबईकरांच्या विक्रमी मतांनी विजयी होऊन संसदेत जाणार, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात थेट लढत होणार आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीने माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने पूनम महाजन यांना तिकीट देण्याचे टाळले होते. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भाजपाने आपला तगडा उमेदवार जाहीर केला आहे. २०१६ मध्ये निकम यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.  

Web Title: Senior lawyer Ujjwal Nikam has announced his candidacy from Mumbai North Central Lok Sabha constituency and Ashish Shelar has expressed his confidence of victory 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.