बजरंग पुनिया आणि रवी दहिया ऑलिम्पिकमधून बाहेर; पात्रता फेरीत दारूण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 06:15 PM2024-03-10T18:15:56+5:302024-03-10T18:16:26+5:30

पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी आयोजित केलेल्या पात्रता फेरीत बजरंग पुनियाचा पराभव झाला आहे.

 Bajrang Punia and Ravi Dahiya have both been eliminated from the Paris Olympics as they lost in the Olympic qualification race  | बजरंग पुनिया आणि रवी दहिया ऑलिम्पिकमधून बाहेर; पात्रता फेरीत दारूण पराभव

बजरंग पुनिया आणि रवी दहिया ऑलिम्पिकमधून बाहेर; पात्रता फेरीत दारूण पराभव

Bajrang Punia and Ravi Dahiya: पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी आयोजित केलेल्या पात्रता फेरीत बजरंग पुनियाचा पराभव झाला आहे. ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पुनियाला रोहित कुमारने पराभूत केले. रवी दहियाला देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे दोन्ही खेळाडूंचे स्वप्न भंगले आहे. स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा धक्का बसला. पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आयोजित राष्ट्रीय निवड चाचणीत पुनियाचा दारूण पराभव झाला. 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (२०२०) कांस्य पदक विजेत्या बजरंगला ६५ किलो फ्रीस्टाईल वजनी गटाच्या उपांत्य फेरीत रोहित कुमारने पराभूत केले. उपांत्य फेरीत रोहितने पुनियाचा ९-१ असा पराभव केला. तसेच टोकिया ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेता खेळाडू रवी दहिया याला देखील पराभवाचा सामना करावा लागला. रवीला ५७ किलो फ्री स्टाईल वजनी गटात उदितने १०-८ अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे बजरंग आणि रवी दहिया हे आगामी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. 

दरम्यान, बजरंग पुनियाला मागील वर्षी चीनमधील हांगझोऊ येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. एवढेच नाही तर कांस्य पदकाच्या लढतीतही बजरंगला जपानी कुस्तीपटू के. यामागुचकडून १०-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्याच्या पराभवानंतर सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला. कारण त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी कोणत्याही स्पर्धात्मक स्पर्धेत भाग घेतला नव्हता. चाचणीशिवाय मोठ्या व्यासपीठावर खेळल्याने त्याच्यावर टीका झाली. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पैलवानांमध्ये बजरंग पुनियाचा समावेश होता. 

Web Title:  Bajrang Punia and Ravi Dahiya have both been eliminated from the Paris Olympics as they lost in the Olympic qualification race 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.