कंपनीत गुंतवणूकीच्या नावाखाली ३० जणांना ५.४८ कोटींचा गंडा

By योगेश पांडे | Published: May 9, 2024 09:52 PM2024-05-09T21:52:53+5:302024-05-09T21:53:12+5:30

तरुणाने पत्नी व दोन बहिणींसह उभे केले रॅकेट : अनेक सेवानिवृत्तांची आयुष्यभराची कमाई हडपली

5.48 crore looted in scam from 30 people in the name of investment in the company | कंपनीत गुंतवणूकीच्या नावाखाली ३० जणांना ५.४८ कोटींचा गंडा

कंपनीत गुंतवणूकीच्या नावाखाली ३० जणांना ५.४८ कोटींचा गंडा

नागपूर: कंपनीत गुंतवणूक केली तर चांगला नफा मिळेल अशी बतावणी करत एका तरुणाने पत्नी व दोन बहिणींसह फसवणूकीचे रॅकेट उभे केले. त्यांच्या जाळ्यात फसलेल्या ३० हून अधिक जणांना त्यांनी ५.४८ कोटींचा गंडा घातला. एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला आहे. अनेक सेवानिवृत्तांची आयुष्यभराची कमाई या ठकबाज कुटुंबाने हडपली. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे.

वासुदेव सखाराम राऊत असे तक्रारदाराचे नाव आहे. २०२१ साली ते सेवानिवृत्त झाले व एका परिचिताच्या सांगण्यावरून त्यांनी त्रिमूर्तीनगरातील निलेश उईके (४०) व त्याची पत्नी प्रियंका उईके (३६) यांची भेट घेतली. आरोपीने त्याची कॅप्टी इन्व्हेस्टमेंट कंपनी असून आमच्याकडून शेअर बाजारात पैसे लावण्यात येतात. गुंतवणूक करणाऱ्यांना नियमितपणे नफा दिला जातो असा दावा त्यांनी केला.

त्यांच्या कंपनीत निलेशच्या बहिणी नेहा रोशन मेश्राम (३५, कॉसमॉस टाऊन, त्रिमूर्तीनगर) व रश्मी उईके - गोडे (४२, हैदराबाद) यादेखील भागीदार असल्याची त्यांनी माहिती दिली. राऊत यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फेब्रुवारी २०२३ पर्यंत २० लाख रुपये गुंतविले व त्यावर त्यांना ९.६४ लाख नफा मिळाल्याचे आरोपींनी सांगितले. गुंतवणूक करत असताना आरोपींनी प्रियंका हिच्या नावाचा २० लाखांचे चेक राऊत यांना दिला होता. ज्यावेळी राऊत यांनी आरोपींना रक्कम परत मागितली तेव्हा ते टाळाटाळ करू लागले. त्यामुळे त्यांनी तो २० लाखांचा चेक बॅंकेत टाकला. मात्र तो वटलाच नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चौकशी सुरू केली. तेव्हा आणखी २९ जणांकडून आरोपींनी पैसे घेऊन गंडा घातल्याची बाब समोर आली. यात संदीप काकडे, दिलीप जयस्वाल, प्रशांत वासनिक, गणेश बागडे, रेणुका बिडकर, अखिलेश शुक्ला, प्रवीण खापेकर, वर्षा खापेकर, वीणा गायकवाड, नितीन कोष्टी, राजश्री कोष्टी, राखी खापेकर, चंद्रकला खापेकर, अभय डंभे, मंगेश परोपटे, अंकेश परोपटे, अर्जुन डोरले, शारदा डोरले, धीरज सोनवने, सुषमा सोनवने, प्रमिला सोनवने, गिरीधर ठाकूर, पूनम ठाकूर, अवकाश तुरंगे, करिष्मा तुरंगे, राजेश गायकवाड, विशाल बिडकर, अमित सिंग, महेश जनबंधू, प्रकाश गुप्ता, रामसिया केशरवानी, अमर केशरवानी, माधुरी फटीक, सियासरन विश्वकर्मा, संजय गुप्ता, दिशा गेडाम, रमेश भोयर, अभिषेक सुनेरी, रामदास गुप्ता यांचा समावेश आहे. राऊत यांनी राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व पोलिसांनी चारही आरोपींविरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरंक्षण) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 5.48 crore looted in scam from 30 people in the name of investment in the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.