काय सांगता? मुंबईकर बेस्टमध्ये विसरले तब्बल २ हजारांवर मोबाइल !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:01 AM2024-04-26T10:01:21+5:302024-04-26T10:03:04+5:30

बेस्ट बसचा ताफा कमी झाल्याने सध्या रस्त्यांवर धावणाऱ्या बस गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे.

mumbai people forget about 2 thousand mobiles in the best buses says report | काय सांगता? मुंबईकर बेस्टमध्ये विसरले तब्बल २ हजारांवर मोबाइल !

काय सांगता? मुंबईकर बेस्टमध्ये विसरले तब्बल २ हजारांवर मोबाइल !

मुंबई : बेस्ट बसचा ताफा कमी झाल्याने सध्या रस्त्यांवर धावणाऱ्या बस गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. या गर्दीत उतरण्याच्या घाईगडबडीत मोबाइलसह अनेक वस्तू प्रवासी बेस्ट बसमध्ये विसरल्याचे प्रकार घडतात. यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण मोबाइल विसरण्याचे असून, महागड्या स्मार्ट मोबाइलचा समावेश  आहे. 

मागील तीन वर्षांमध्ये दोन हजार ३२७ मोबाइल प्रवासी बसमध्ये विसरले आहेत. यामध्ये नवीन वर्षातील मागच्या तीन महिन्यात आणखी ७९ मोबाइलची भर यात पडली आहे. विसरलेल्या या मोबाइलपैकी एक हजाराहून अधिक प्रवाशांना आपापले मोबाइल परत मिळाले असल्याची माहिती ही बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

बेस्टने प्रवास करणारे प्रवासी अनेकदा मोबाइल, मौल्यवान वस्तू, गोष्टी बसमध्ये विसरतात. त्यामुळे प्रवासात विसरलेले महागडे मोबाइल पुरावा सादर करून घेऊन जा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून जाहिरातीद्वारे करण्यात येते. 

...तर फोन भंगारात

बेस्ट उपक्रमाकडून हरवलेल्या प्रत्येक मोबाइलच्या मॉडेलची माहिती दिली जाते. त्यानुसार अनेक प्रवासी बेस्ट बस आगारात संपर्क साधून आपला मोबाइल परत मिळवतात. मात्र बेस्टने दोन ते तीन वेळा आवाहन केल्यानंतरही आणि महिनाभर वाट पाहूनही गहाळ झालेला मोबाइल घेण्यासाठी प्रवासी न आल्यास मोबाइल भंगारात काढले जातात, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली. 

वस्तूंचाही विसर...

ब्लूटूथ, इअरफोन, की-बोर्ड व माउस, पॉवर बँक, लॅपटॉप, कॅमेरा स्टॅण्ड, की-बोर्ड, कॅलक्युलेटर या वस्तूही प्रवासी बेस्ट प्रवासात विसरतात. या वस्तूही वडाळा येथील बेस्टच्या गहाळ आणि मालमत्ता विभागाकडून परत मिळवता येतात.

मागील ३ महिन्यांत बेस्टला मिळालेले मोबाइल -

महिना                           मोबाइल संख्या 

जानेवारी २०२४                      ३२ 
फेब्रुवारी २०२४                      ३७  
मार्च       २०२४                       २६

विसरलेले मोबाइल कसे मिळवाल?

१)  बसमध्ये विसरलेला मोबाइल अन्य प्रवाशांकडून वाहकाकडे सुपूर्द केला जातो. त्यानंतर हा मोबाइल वडाळामधील बेस्टच्या गहाळ आणि मालमत्ता विभागाकडे जमा केला जातो. 

२)  सापडलेला मोबाइल परत मिळवण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाते. तशी जाहिरातही करण्यात येते. एका महिन्याच्या आत मोबाइलवर दावा न केल्यास मोबाइल भंगारात काढला जातो. यासाठी ओशिवरा येथे भंगार यार्डही आहे.

३)  गहाळ झालेला मोबाइल बेस्टच्या वडाळा येथील कार्यालयाकडून मिळवण्यासाठी आधारकार्ड किंवा अन्य फोटो ओळखपत्र, मोबाइलचे बिल किंवा पोलिस ठाण्यात मोबाइल हरवल्याची तक्रार केली असल्यास त्याची कॉपी सादर करावी लागते.

Web Title: mumbai people forget about 2 thousand mobiles in the best buses says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.