आर्यालीचे सुवर्णमहोत्सवी विजेतेपद

By admin | Published: June 22, 2015 11:02 PM2015-06-22T23:02:56+5:302015-06-22T23:02:56+5:30

अनेकांकडून कौतुकाची थाप : पटना येथील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विजेती

Aryali Gold Medal of the Year | आर्यालीचे सुवर्णमहोत्सवी विजेतेपद

आर्यालीचे सुवर्णमहोत्सवी विजेतेपद

Next

सातारा : ठोसेघर, ता. सातारा यासारख्या दुर्गम गावातील आर्याली अमृतसिंह चव्हाण हिने टेनिसमध्ये मोठी झेप घेतली आहे. नुकत्याच बिहारमधील पाटना येथे झालेल्या महिलांच्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत ती विजेती ठरली. आतापर्यंत आर्यालीने टेनिसमध्ये ५० वेळा विजेतेपद मिळविले आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या वतीने पटना येथे महिलांच्या खुल्या मानांकन राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सातारच्या आर्याली चव्हाणने विजेतेपदासह दुहेरीचेही उपविजेतेपद मिळविण्याचा पराक्रम केला. स्पर्धेचे विजेतेपद मिळविताना आर्यालीने पहिल्या फेरीत बिशाका सिंग (उत्तरप्रदेश) हिचा ६-१, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दुसऱ्या फेरीत आयुशी तनवर (राजस्थान) हिचा ६-२, ६-३ असा प्रतिकार मोडून काढला. उपांत्यपूर्व फेरीत शमिका धार (कर्नाटक) हिला ६-०, ६-१ असे सरळ पराभूत केले. उपांत्य फेरीच्या सामन्यात उत्तरप्रदेशच्या ओमलता राय हिला ६-२, ६-१ असे हरवून अंतिम फेरी गाठली.
मागील महिन्यात दिल्ली येथे आर्यालीस अंतिम सामना सोडून द्यावा लागल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात आर्यालीने जोरदार खेळाचे प्रदर्शन केले. या सामन्यात आर्यालीने ओरिसाच्या शिल्पा दास हिचा ६-१, ६-० असा पराभव करून एकतर्फी मोठा विजय मिळविला. या विजयामुळे आर्यालीच्या एकूण राष्ट्रीय मानांकन गुणात चांगलीच वाढ झाली आहे.
आर्यालीचे वडील अमृतसिंह चव्हाण हे एलआयसी अधिकारी आहेत. आर्यालीला टेनिस खेळाडू घडवायचे म्हणूनच त्यांनी टेनिस प्रथम शिकून घेतले. तेच आर्यालीचे प्रशिक्षक झाले.
टेनिस खेळाडूत डिसेंबर २०१५ पर्यंत राज्यात पहिली व देशात पहिल्या पाचमध्ये येण्याचा आर्यालीचा निधार आहे. अशा या सातारच्या गुणी मुलीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)

विजयाचे अर्धशतक...
२००१ मध्ये पहिलीत असताना आर्यालीने टेनिस खेळण्यास सुरुवात केली. २००४ रोजी राज्य संघटनेच्या दहा वर्षीय गटाच्या आंतरजिल्हा स्पर्धा नांदेडला झाल्या. त्यामध्ये आर्यालीने सलग १५ स्पर्धकांना पराभूत करून विजय मिळवत राज्यात प्रथम येण्याचा पराक्रम केला.
सलग १३ शासकीय राज्य स्पर्धा १० राष्ट्रीय स्पर्धा खेळून अनेकवेळा राज्याचे कर्णधारपद भूषविले आहे. पाटना येथील स्पर्धेत विजेतेपद मिळवून तिने अर्धशतक पूर्ण केले आहे.
४आर्यालीने मिळविलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. अनेकांनी तिचा सत्कार केला.

Web Title: Aryali Gold Medal of the Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.