काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:29 PM2024-04-27T12:29:33+5:302024-04-27T12:31:46+5:30

Mumbai Congress महाविकास आघाडीत मुंबईतील लोकसभा मतदार संघांच्या बाबतीत जागा वाटपावरुन काँग्रेसमध्ये सुरू असलेली खदखद काही थांबताना दिसत नाही.

Maharashtra Congress leader refuses to campaign over no ticket to Muslims | काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!

काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!

मुंबई

Mumbai Congress ( Marathi News ) : महाविकास आघाडीत मुंबईतील लोकसभा मतदार संघांच्या बाबतीत जागा वाटपावरुन काँग्रेसमध्ये सुरू असलेली खदखद काही थांबताना दिसत नाही. संजय निरुपम, बाबा सिद्दिकी, मिलिंद देवरा यांनी रामराम ठोकल्यानंतर आता ज्येष्ठ नेते नसीम खान देखील पक्षाच्या भूमिकेवर नाराज झाले आहेत. मुंबईतील उत्तर-मध्य मतदार संघात वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नसीम खान यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करुन दाखवली आहे. राज्यात काँग्रेसनं एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. यामुळे अल्पसंख्याक समाज मला प्रश्न विचारत आहे. मुस्लिम समाज माझ्याजवळ रोष व्यक्त करत असल्यानं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. त्यामुळे पक्षाच्या प्रचारकपदाचा राजीनामा देत आहे, असं नसीम खान यांनी जाहीर केलं आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत नसीम खान यांनी घोषणा केली.

"प्रश्न माझ्या नाराजीचा नाही. प्रश्न अल्पसंख्याक समाजाचा आहे. राज्यात काँग्रेसनं एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. यामुळे समाज प्रचंड नाराज आहे. प्रत्येक जण मला फोन करुन रोष व्यक्त करत आहे. काँग्रेसचा एक ज्येष्ठ आणि जुना कार्यकर्ता म्हणून नेतृत्त्वाला सजग करणं हे मी माझं काम समजतो म्हणून नाराजी उघडपणे व्यक्त करत आहे. आतापर्यंत पक्षाने सांगितलं तिथं जाऊन प्रचार केला. पण आता मी काँग्रेसच्या प्रचारकपदाचा राजीनामा देत आहे. यापुढे मी काँग्रेसचा प्रचार करणार नाही", असं नसीम खान म्हणाले. 

कोणतीही ऑफर नाही
नसीम खान नाराज असल्याची बातमी समोर आल्यानंतर एमआयएम पक्षाचे इम्तिजाय जलील यांनी पुढाकार घेत नसीम खान यांनी एमआयएममध्ये यावं उमेदवारी जाहीर करू असं म्हटलं आहे. याबाबत बोलताना नसीम यांनी एमआयएमवर मला कोणतंही भाष्य करायचं नाही. त्यांचा मी आभारी आहे. पण मला कोणतीही ऑफर आलेली नाही. मी काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे आणि राहुल गांधी आमचे नेते आहेत, असं नसीम खान म्हणाले. 

वर्षा गायकवाड बहिणीसारख्या
उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून मला उमेदवारी मिळणार होती तसा विचार सुरू होता असं मला तरी सांगण्यात आलं होतं. पण तसं घडलं नाही. वर्षा गायकवाड यांच्यावर माझी अजिबात नाराजी नाही. त्या मला बहिणीसारख्याच आहेत. माझा आक्षेप उमेदवारावर नाही. धोरणावर आहे. राज्यात काँग्रेसला एकही मुस्लीम उमेदवार देता आला नाही हा माझा प्रश्न आहे, असंही नसीम खान म्हणाले.

Web Title: Maharashtra Congress leader refuses to campaign over no ticket to Muslims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.