सेनेने पाठिंबा काढला तरी सत्तेची व्यवस्था

By admin | Published: May 22, 2016 12:56 AM2016-05-22T00:56:01+5:302016-05-22T00:56:01+5:30

चंद्रकांतदादा पाटील : हसन मुश्रीफ पुढीलवेळी कागलचे आमदार होणार नसल्याचा केला दावा

Although the support from the army has been withdrawn, the system of power is removed | सेनेने पाठिंबा काढला तरी सत्तेची व्यवस्था

सेनेने पाठिंबा काढला तरी सत्तेची व्यवस्था

Next

गारगोटी : जाणूनबुजून हेतूपुरस्सर माझ्यावर टीका करणारे हसन मुश्रीफ पुन्हा कागलचे आमदार होणार नाहीत याची आम्ही पूर्ण तयारी केली असून, याच भीतीपोटी ते माझ्यावर टीका करतात की काय? कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी भाजपचे आमदार मी करणार आहे, असे परखड मत पालकमंत्री व बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेने पाठिंबा काढला तरी पाच वर्षे सरकार टिकवण्याची व्यवस्था केली असल्याचे ते म्हणाले.
भुदरगड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गारगोटी (ता. भुदरगड) येथे इंजुबाई सांस्कृतिक सभागृहात आयोजित केला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक बाबा देसाई होते. भाजप तालुका अध्यक्ष नाथाजी पाटील, मौनी विद्यापीठ सदस्य अलकेश कांदळकर, प्रा. एच. आर. पाटील प्रमुख उपस्थित होते.
पाटील म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका थोड्याच कालावधीमध्ये लागणार असून, प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समितीनुसार इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागावे. कोणी कितीही वल्गना केल्या तरी किंवा शिवसेनेनेही जरी पाठिंबा काढून घेतला तरी पर्यायी व्यवस्था मी व मुख्यमंत्र्यांनी केलेली असल्यामुळे भाजपचे सरकार पाच वर्षांचा काळ पूर्ण करेल. कार्यकर्त्यांनी त्याची चिंता करू नये.
शासनाच्या विविध योजना आम्ही राबवीत असून, कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांच्यात त्यांचा प्रसार करावा. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपल्यासोबत आणखी एक मजबूत मित्र येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी एकसंधपणे निवडणुकांना सामोरे जावे, विजय आपलाच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई म्हणाले, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या भगीरथ प्रयत्नामुळेच भाजपचे यश जिल्ह्यात दिसू लागले आहे. आमदार मुश्रीफ कितीही आरडाओरडा करू देत, भाजप पूर्ण जिल्ह्यातील गावागावांत आणि घराघरांत पोहोचणार आहे. भुदरगड भाजपचे तालुका अध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबरोबरच भाजप गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पूर्ण तयारीनिशी उतरणार आहे. मौनी विद्यापीठाचे सदस्य अलकेश कांदळकर म्हणाले, शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. प्राचार्य मोरस्कर, योगेश परुळेकर, आदींनी मनोगते व्यक्त केली. व्यासपीठावर संतोष पाटील, नामदेव चौगले, आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांची गर्दी
सहकाराला राजकीय अड्डा बनविल्यामुळे मेळाव्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी चारचाकींचा ताफा उभा करते. मात्र, गेल्या दोन वर्षांत भाजपने दखल घेण्याइतपत आघाडी घेतली असून, आजच्या मेळाव्याला सभागृहात भरगच्च गर्दी ओसंडून वाहत होती. विशेष म्हणजे भाजपच्या मेळाव्याला दुचाकी वाहनांची गर्दी होती.

Web Title: Although the support from the army has been withdrawn, the system of power is removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.