संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 12:28 PM2024-05-06T12:28:09+5:302024-05-06T12:29:03+5:30

Sant Goroba Kaka Punyatithi 2024: संत गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणून ओळखले जाते. पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या, संतमहात्म्य आणि कार्य...

sant goroba kaka punyatithi 2024 know about sant gora kumbhar on remembrance | संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती

संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती

Sant Goroba Kaka Punyatithi 2024: महाराष्ट्राला मोठी वारकरी परंपरा लाभलेली आहे. पैकी एक म्हणजे संत गोरा कुंभार. संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (२० एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. यंदा २०२४ मध्ये ०६ मे रोजी संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी आहे. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर धाराशिव जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत गोरोबा काका यांची मंदिरे आहेत.

गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. तेर येथील 'काळेश्वर’ या ग्रामदैवताचे त्यांचे घराणे उपासक होते. त्यांचे आई-वडील कुंभारकाम व काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे तेर गावात त्यांचे वडील माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिले. 

संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते

संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पहायला मिळतात. संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते, संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना “काका” ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले. निर्गुण निराकार परब्रम्हाचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून, संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती.

निर्गुणाचें भेटी आलों सगुणासंगें । तंव झालो प्रसंगीं गुणातीत ॥१॥ 
मज रूप नाहीं नांव सांगू काई । झाला बाई बोलूं नये ॥२॥
बोलतां आपली जिव्हा पैं खादली । खेचरी लागली पाहतां पाहतां ॥३॥
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी । सुखासुखी मिठी पडली कैसी ॥४॥

हा संत गोरा कुंभार यांचा अभंग प्रसिद्ध आहे. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग रचना केल्या आहेत. संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर नाटक, चित्रपट निर्मिती झालेली आहे. मराठीतील संत गोरा कुंभार हा चित्रपट अतिशय गाजला होता. गोरोबांच्या मनावर लहानपणापासूनच भगवद्भक्तीचे संस्कार झाले होते.गोरोबांना ज्ञानदेव, नामदेव यांच्या पूर्वकाळात पंढरपूर हे शिव उपासकांचे/भक्तांचे केंद्र होते. अनेक शिवभक्त त्याठिकाणी आपली साधना करीत होते. ते भक्त होते, योगी होते. सिद्ध, साधकही होते. गोरोबा जेव्हा जेव्हा पंढरपूरला जात तेंव्हा त्यांना या सिद्ध पुरुषाचं दर्शन होई. गोरोबाकाकांच्या चरित्रातील हे तन्मयवृत्तीचे एक अत्यंत प्रभावी असे उदाहरण आहे. 

विठ्ठलाचे नामस्मरण हेच गोरोबांचे जीवन झाले

एके दिवशी गोरोबा पायाने चिखल तुडवित होते. त्यांचे सर्व ध्यान पांडुरंगचरणी लागलेले असे. गोरोबा जरी संसारात दंग होते. तरी विठ्ठल भक्ती आणि विठ्ठलाचे नामस्मरण हेच गोरोबांचे जीवन झाले होते. संत जन्मतःच ईश्वरभक्त त्याचकरिता त्यांचा जन्म होता. पांडुरंगाच्या नामस्मरणात ते आपली तहानभूक हरपून जात. असे गोरोबा विठ्ठल नामस्मरणात रममाण झाले होते. गोरोबा चिखल तुडवित असताना त्यांचे बाळ रांगतरांगत पित्याकडे धावत आहे. अन् ते खेळत खेळत बापाचा पाय धरून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागले. हसतहसत पित्याच्या पायाला धरता धरता ते चिखलात पडते. गोरोबा काका डोळे मिटून भाव समाधीत होते. हृदयी अनंतास आठवीत होते. देहवृत्ती शून्य दशेतच विठ्ठल नामस्मरणात रत होते. मन देवस्वरूपी एकाग्र झाले असताना त्या चिखलात त्यांचा एकलुता एक मुलगा पायाखाली आला. ते चिखलासवे मुलालाही तुडवू लागले. त्याचा व्हायचा तो अटळ परिणाम झाला, ही कथा प्रचलित आहे. 

जम्मू शहरात संत गोरोबा काका यांचे मंदिर

संत नामदेव उत्तर भारतात खूपच प्रसिद्ध आहेत. संत नामदेवांनी महाराष्ट्रासह उत्तर भारतातही मोठे कार्य केले आहे. संत नामदेव यांच्याप्रमाणेच संत गोरा कुंभार यांचीही ख्याती उत्तर भारतात असल्याचे सांगितले जाते. जम्मू शहरात आजपासून ३४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या संत गोराजी कुंभार यांच्या मंदिराला आता हजारो भाविक नित्य भेट देत आहेत. महिन्याच्या पहिल्या रविवारी या मंदिरात भाविकांसाठी लंगरदेखील लागतो. जम्मू शहरातील इंदिरा गांधी चौकातील गोराजी कुंभार यांचे मंदिर आता देशभरातील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण म्हणून हळूहळू उजेडात येऊ लागले आहे. जम्मू शहरात प्रजापती कुंभार समाज वास्तव्यास आहे. समाजाचे संघटन मोठे आहे. त्यातून त्यांना समाजाच्या संघटनाला चालना देण्यासाठी एक मंदिर निर्माण करण्याची कल्पना सुचली. महाराष्ट्रात संत नामदेव यांचे समकालीन असलेले संत गोरोबा कुंभार होऊन गेल्याची माहिती त्यांना मिळाली. व्यवसायाने अभियंता असलेले समाजाच्या सोसायटीचे अध्यक्ष अयोध्याकुमार मनावा यांनी पुढाकार घेतला. उत्स्फूर्तपणे अनेकांनी आर्थिक हातभार लावला आणि जानेवारी १९८६ साली जम्मू शहरात पहिल्यांदा या मंदिराच्या माध्यमातून संत गोराजी कुंभार यांची प्रत्यक्ष ख्याती पोहोचली.

संत गोरा कुंभार आरती

सत्तावीस युगे सत्यपूर नगरी ।
न वर्णवे त्या हरी हरा थोरी ।
अखंड ध्यातो पूजा विस्तारी ।
शुक सनकादीक जय जय हाकारी ।
जय देव जय देव जय गोरोबा ।
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा ।
जय देव जय देव … ।। धृ ।।

धन्य कवित्व अनुपम्य केले ।
ऐकता जीव शिव संतुष्ट झाले ।
पाहता पाऊल विश्व मावळले ।
अनुभव घेता सद्गुरू भेटले ।
जय देव जय देव जय गोरोबा ।
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा ।
जय देव जय देव … ।। १ ।।

दूरपण उघडे तुजपाशी केले ।
अनुभव घेता तापसी झाले ।
म्हणुनी नामा ओवाळी भावे ।
त्यापाशी देव कैवल्य साचे ।
जय देव जय देव जय गोरोबा ।
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा ।
जय देव जय देव … ।। २ ।।

संत गोरोबा काका आरती

जय देव जय देव जय गोरोबा
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा जय देव जय देव || १ ||
धन्य कवित्व अनुपम्य केले |
ऐकता जीव शिव संतुष्ट झाले ||
पाहता पाऊले विश्व मावळले ||
जय देव जय देव जय गोरोबा
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा जय देव जय देव || २ ||
दूरपण उघडे तुजपाशी केले |
अनुभव घेता तापसी झाले ||
म्हणुनी नामा ओवाळू भावे |
त्या पाशी देव कैवल्यसाचे ||
जय देव जय देव जय गोरोबा
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा जय देव जय देव || ३ ||
 

Web Title: sant goroba kaka punyatithi 2024 know about sant gora kumbhar on remembrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.