मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 04:07 PM2024-05-10T16:07:33+5:302024-05-10T16:08:09+5:30

Indian soldiers withdrawn from Maldives: आज भारतीय सैनिकांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली. मात्र दिलेल्या माहितीत जवानांचा नेमका आकडा सांगण्यात आलेला नाही.

India has completed the withdrawal of all its soldiers from Maldives as announced by May 10 deadline set by President Mohamed Muizzu | मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत

मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत

Indian soldiers withdrawn from Maldives: भारतीय लष्करी जवानांच्या माघारीसाठी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (President Mohamed Muizzu) यांनी भारताला 10 मे या तारखेची मुदत दिली होती. त्यानुसार भारताने मालदीवमधून आपले सर्व सैनिक माघारी बोलवून घेतले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. राष्ट्रपती कार्यालयाच्या मुख्य प्रवक्त्या हीना वालीद यांनी Sun.mv न्यूज पोर्टलला सांगितले की, आज भारतीय सैनिकांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली आहे. मात्र त्यांनी दिलेल्या माहितीत जवानांचा एकूण आकडा नमूद करण्यात आलेला नाही. तैनात असलेल्या सैनिकांच्या संख्येबद्दलचा तपशील नंतर उघड केला जाईल असे त्या म्हणाल्या.

भारत आणि मालदीवमध्ये सुमारे 6 महिन्यांच्या तणावानंतर मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर संबंध सुधारण्यासाठी भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान भारतीय जवानांची शेवटची तुकडी भारतात परत पाठवण्यात आली. मोहम्मद मुइज्जू यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान मालदीवच्या भूमीवरील भारतीय लष्कराची तैनाती संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले होते. मालदीवमधून भारतीय सैन्याच्या पूर्ण माघारीसाठी 10 मे पर्यंत वेळ दिला होता. त्यानंतर आज भारताचे सर्व सैनिक मायदेशी परतले.

मालदीवमध्ये भारतीय सैनिक का तैनात करण्यात आले?

भारताने भेट दिलेली दोन हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमाने चालवण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये तैनात करण्यात आले होते. चीनच्या पाठिंब्याचे सरकार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या मालदीवच्या नव्या मुईज्जू सरकारने सत्तेवर आल्यानंतर देशात भारतीय सैन्य तैनात करण्यास विरोध दर्शवला होता आणि त्यांना परत पाठवण्याचे आदेश जारी केले होते. यापूर्वी, मालदीव सरकारने सोमवारी 51 सैनिकांना भारतात परत पाठवल्याची घोषणा केली होती. तर सरकारने अधिकृत कागदपत्रांचा हवाला देत मालदीवमध्ये 89 भारतीय सैनिकांची उपस्थिती असल्याची माहिती दिली होती.

Web Title: India has completed the withdrawal of all its soldiers from Maldives as announced by May 10 deadline set by President Mohamed Muizzu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.