नायजेरियात कारबॉम्ब स्फोटात ११८ ठार

By admin | Published: May 21, 2014 11:17 PM2014-05-21T23:17:50+5:302014-05-21T23:17:50+5:30

नायजेरियाच्या जोस शहरात कारबॉम्बचा दुहेरी स्फोट झाला असून, त्यात ११८ पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत.

118 killed in car bomb explosion in Nigeria | नायजेरियात कारबॉम्ब स्फोटात ११८ ठार

नायजेरियात कारबॉम्ब स्फोटात ११८ ठार

Next

लागोस : नायजेरियाच्या जोस शहरात कारबॉम्बचा दुहेरी स्फोट झाला असून, त्यात ११८ पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. बाजारपेठेत गर्दीच्या वेळी हे स्फोट २० ते ३० मिनिटांच्या अंतराने झाले. त्यामुळे संपूर्ण परिसर आगीने वेढला गेला. आतापर्यंत ११८ मृतदेह मिळाले आहेत; पण आणखी मृतदेहांचा शोध ढिगार्‍याखाली घेतला जात आहे, असे राष्टÑीय आणीबाणी समितीचे समन्वयक अब्दुल सलाम यांनी सांगितले. या स्फोटात ५६ जण जखमी झाले आहेत. एक ट्रक व एका मिनीबसमध्ये आयईडी स्फोटके लपवून ठेवण्यात आली होती. एकापाठोपाठ २० मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट झाले, असे सलाम यांनी सांगितले. जोस हे शहर प्लॅटेऊ राज्यात आहे. प्लॅटेऊचे आयुक्त ख्रिस ओलाक्पे यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला आत्मघातकी कारबॉम्बचा स्फोट होता, तर दुसरा स्फोट आयईडीचा होता. हा दहशतवादी हल्ला होता, असे त्यांनी म्हटले आहे; पण हल्ल्यामागे कोणती संघटना आहे, त्याचे नाव त्यांनी सांगितले नाही. या स्फोटात ४६ जण मरण पावले असून, ४५ जखमी असल्याचे त्यांनी सांगितले. अब्दुल सलाम यांनी दिलेली मृतांची संख्या त्यामुळे वादग्रस्त ठरली आहे. त्यानंतर ओलाक्पे यांनी आपले निवेदन बदलले असून, आपण शवागारात ठेवलेल्या मृतदेहांबद्दल बोलत होतो, असे म्हटले आहे. नायजेरियाचे अध्यक्ष गुडलक जोनाथन यांनी यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यात हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. मानवी स्वातंत्र्यावर हा घाला आहे, असे म्हटले आहे. नायजेरियात दहशतवादी घटनांचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे. १४ एप्रिल रोजी बोको हराम संघटनेने २७६ मुलींचे चिबॉक येथील शाळेतून अपहरण केले असून, त्यातील काही मुलींना इस्लाम धर्मात धर्मांतरित करण्यात आले आहे. अद्याप २०० मुली बेपत्ता आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: 118 killed in car bomb explosion in Nigeria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.