कंत्राटी डॉक्टर ९ महिन्यांपासून वेतनापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 01:35 PM2024-04-27T13:35:17+5:302024-04-27T13:37:23+5:30

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ढासळली : वैद्यकीय अधिकाऱ्यावर उपासमारीची वेळ

Contract doctors deprived of salary for 9 months | कंत्राटी डॉक्टर ९ महिन्यांपासून वेतनापासून वंचित

Contract doctors deprived of salary for 9 months

लोकमत न्यूज नेटवर्क 
तुमसर :
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कार्यरत असलेल्या कंत्राटी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना तब्बल ९ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. परिणामी या वैद्यकीय अधिकाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आली की काय असे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नोकरी करणे पसंद करीत नाही.

परिणामी त्या डॉक्टरांचा सेवा काळ संपताच ते नोकरीचा राजीनामा देऊन मोकळे होतात. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणाचे तीन तेरा वाजतात. परिणामी
राज्य शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांच्या कालावधीकरिता बीएएमएस डॉक्टरची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषद भंडाराने सप्टेंबर २०२३ ला कंत्राटी पद्धतीने भरती करून जिल्ह्यात नियुक्त केले.

मात्र नियुक्तीपासून ते आजपर्यंतचे वेतन (मानधन) या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळालेले नाही. एकूणच बिन पगारी फुल अधिकारी अशी
काहीशी स्थिती या वैद्यकीय अधिकाऱ्यांची झाली आहे.

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी हे २४ तास प्राथमिक आरोग्य केंद्रावर सेवा देत आहेत. पण पगार मागण्यासाठीसुद्धा त्यांना जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना फोनवर फोन करावे लागत आहेत.

समोरून फक्त आश्वासन देण्यात येत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.

निधीचा तुटवडा असल्याने त्यांना वेतन मिळाले नाही. मात्र आता निधी आल्याने सोमवारला त्यांच्या खात्यात वेतन जमा केले जाणार आहे.
- रवींद्र राठोड, प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा. 

 

Web Title: Contract doctors deprived of salary for 9 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.