मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 11:20 AM2024-05-09T11:20:50+5:302024-05-09T12:02:50+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं असून, भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता आहे, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. 

Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Modi's mental health has completely deteriorated, BJP is on him...', Sanjay Raut's blunt criticism | मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला

मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं असून, भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता आहे, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. 

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की,  नरेंद्र मोदी यांचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं आहे. भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या या लाडक्या नेत्यावर उपचार करणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही. दहा वर्षे जी व्यक्ती पंतप्रधानपदावर बसलेली आहे. नेतृत्व करत आहे. जे तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांनी देशाचं भवितव्य, देशाचा विकास, या विषयावर आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत. मला तिसऱ्यांदा का निवडून द्यायला पाहिजे, यासाठी माझ्याकडे ही ब्लू प्रिंट आहे, असं सांगितलं पाहिजे. मी दहा वर्षांत ही कामं केली आहेत, हे सांगितलं पाहिजे. मात्र मोदींनी एकाही प्रचारसभेत अशी भूमिका मांडल्याचं दिसलं नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली आहे. जेव्हा पंतप्रधानपदावरील व्यक्ती प्रचाराच्या निमित्ताने काहीही बोलू लागले. तेव्हा त्यांची प्रकृती बरी नाही, असे दिसते. त्यांच्या प्रकृतीला काहीतरी त्रास आहे आणि भाजपाने त्यांना तातडीने प्रचारातून बाजूला करून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष दिलं पाहिजे. पंतप्रधानांची प्रकृती बरी नसल्याचं दिसतंय. ते सतत ज्या प्रकारची वक्तव्य करताहेत ते चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही. काल ते कुठेतरी परत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार नाहीत, असं विधान त्यांनी केलं. हे त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे. तेलंगाणात जाऊन त्यांनी काँग्रेस पक्ष हा अदानी आणि अंबानींकडून यांच्या काळ्या पैशावर निवडणुकी लढवताहेत. राहुल गांधी यांना या उद्योगपतींकडून टेम्पो भरभरून पैसा मिळतोत, असं विधान मोदींनी केलंय. ज्याने अदानीला संपूर्ण देश विकत घेण्यासाठी मदत केली. सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली. उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. तेच मोदी जेव्हा त्यांच्या आर्थिक आश्रयदात्यांवर टीका करू लागले आहेत, ते पाहता ते पराभूत झाले आहेत. मोदींनी केलेले आरोप खरे असतील तर त्यांनी पीएमएलए कायद्याद्वारे या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी खिचडी घोटाळ्यावरून केलेल्या टीकेबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ४ जूनपर्यंत तुम्हाला जे तांडव करायचं आहे ते करा. त्यानंतर आम्ही तुमचे सगळे घोटाळे बाहेर काढू. एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारावर बोलावं हे फार मोठं आश्चर्य आहे. स्वत: केलेल्या भ्रष्टाचाराला घाबरून ज्या माणसानं पलायन केलं. स्वत:चे घोटाळे उघड होत असल्याने अटक होईल या भीतीने ज्याची गाळण उडाली, पाय लटपटू लागले. डोळ्यातून अश्रू काढले, असा माणूस भ्रष्टाचारावर बोलतो, हे गमतीशीर आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Modi's mental health has completely deteriorated, BJP is on him...', Sanjay Raut's blunt criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.