सातारा लोकसभेच्या नऊपैकी दोन निवडणुकीत शिवसेनेचा बाण भात्यात!

By नितीन काळेल | Published: April 24, 2024 07:33 PM2024-04-24T19:33:00+5:302024-04-24T19:34:49+5:30

हिंदुराव नाईक-निंबाळकर पाचवेळा उमेदवार: एकवेळा विजय; आता भाजपचा कब्जा

Shiv Sena's Hindurao Naik Nimbalkar has been nominated five times for Satara Lok Sabha | सातारा लोकसभेच्या नऊपैकी दोन निवडणुकीत शिवसेनेचा बाण भात्यात!

सातारा लोकसभेच्या नऊपैकी दोन निवडणुकीत शिवसेनेचा बाण भात्यात!

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेना १९९१ पासून धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढवत असली तरी आतापर्यंतच्या ९ पैकी २ सार्वत्रिक रणधुमाळीत बाण भात्यातच राहिला आहे. आता तर शिवसेनेच्या मतदारसंघावर भाजपनेच कब्जा केल्याचे दिसून येत आहे. यामुळे शिवसैनिकांना इच्छा असूनही लढता आलेले नाही. सातारा लोकसभेसाठी हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी सर्वाधिक पाचवेळा उमेदवारी केली. यामध्ये एकवेळ त्यांचा विजय झाला होता. शिवसेनेने २०१४ आणि २०२४ या दोन निवडणुका मित्रपक्षांना संधी दिल्याने धनुष्यबाण भात्यातच राहिला आहे.

राज्यात शिवसेना आणि भाजपची युती ३५ वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर या युतीने राज्यातील मतदारसंघ वाटून घेतले. सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला. त्यामुळे १९९१ पासून शिवसेना सातारा लोकसभा मतदारसंघात बाण ताणत आली आहे. मात्र, २०१४ ची सार्वत्रिक आणि २०१९ मधील पोटनिवडणूक तसेच आताचीही सार्वत्रिक निवडणूक शिवसेना आणि शिवसैनिकांसाठीही वेगळी ठरली. कारण, या तीन निवडणुकीत बाण भात्यातच राहिला. त्याला दिशा मिळालीच नाही. फक्त युतीतील उमेदवारांसाठी काम करण्याची वेळ आली.

१९९१ पासून आतापर्यंत लोकसभेच्या ८ निवडणुका झाल्या. आताची २०२४ ची निवडणूक ९ वी आहे. या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असतानाही शिवसेनेला मतदारसंघ मिळालेला नाही. शिवसेनेने सातारची पहिली निवडणूक १९९१ ला लढविली. त्यावेळी काँग्रेसचे विद्यमान खासदार प्रतापराव भोसले यांच्या विरोधात सेनेने फलटणच्या हिंदुराव नाईक-निंबाळकर यांना रिंगणात उतरवले. या निवडणुकीत नाईक-निंबाळकर यांचा पराभव झाला असला तरी एक लाखाहून अधिक मते मिळवली होती. यानंतर नाईक-निंबाळकर यांनी दुष्काळ आणि पाणीप्रश्नावर जोरदार आवाज उठवला. त्यातच राज्यात युतीची सत्ता होती. त्यामुळे १९९६ च्या निवडणुकीत त्यांना फायदा झाला.

महायुतीत ‘रिपाइं’लाही मिळाला मतदारसंघ..

२००९ च्या लोकसभा निवडणुकीपासून मतदारसंघाची पुनर्रचना झाली. माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभेसाठी जोडले गेले. तर २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार उभा केला नाही. राज्यात महायुती निर्माण झाली. ‘रिपाइं’ (ए) चे रामदास आठवले युतीत आल्याने त्यांच्यासाठी सातारा मतदारसंघ सोडण्यात आला. त्याठिकाणी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड उभे होते. तर आताही शिवसेनेला सातारा लोकसभा मतदारसंघ मिळाला नाही. या निवडणुकीत महायुतीकडून उदयनराजे मैदानात आहेत. त्यामुळे १९९१ पासून एका पोटनिवडणुकीसह दोन सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नाही.

Web Title: Shiv Sena's Hindurao Naik Nimbalkar has been nominated five times for Satara Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.