सातारा लोकसभेची सुरुवातच गुद्यांनी; विकासाच्या मुद्यांचे काय?

By दीपक शिंदे | Published: April 17, 2024 10:25 PM2024-04-17T22:25:16+5:302024-04-17T22:25:22+5:30

नेत्यांनी एकमेकांवर केले आरोप : विकासाचा कोणता मुद्दा अजेंड्यावर

Satara Lok Sabha started with attacks; What about development points? | सातारा लोकसभेची सुरुवातच गुद्यांनी; विकासाच्या मुद्यांचे काय?

सातारा लोकसभेची सुरुवातच गुद्यांनी; विकासाच्या मुद्यांचे काय?

सातारा: सातारा लोकसभेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. शशिकांत शिंदे यांच्यावर नवी मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचार तर उदयनराजेंबाबत रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप करण्यात आला. यात सातारा जिल्ह्याच्या विकासाचा कोणताच मुद्दा दोन्ही उमेदवारांनी अजून तरी मांडला नसून तो अजेंड्यावर घेण्याची आवश्यकता आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ हा पुणे आणि सांगली, कोल्हापूर यांना जोडणारा मतदारसंघ आहे. आत्तापर्यंत या मतदारसंघासाठी कोणी काय केले आणि कोणी केले नाही. ही बाब बाजूला ठेवली तरी साताऱ्याचा विकास अपेक्षितपणे झालेला नाही हे कोणीही मान्य करेल. मुळातच याठिकाणी वाहतुकीची चांगली यंत्रणा असताना खूप चांगल्या पद्धतीने विकास होणे अपेक्षित होते. मात्र, त्याला त्या प्रमाणात संधी मिळालेली नाही हे मान्य करायलाच हवे. सर्वांत महत्त्वाचा साताऱ्याचा प्रश्न आहे तो तरुणांच्या रोजगाराचा. या ठिकाणी नवीन उद्योग येण्याचे प्रमाण मागील काही वर्षांत शून्य टक्क्यांवर आहे. इथलेच काही उद्योग आपली वाढीची संकल्पना मांडतात.

मात्र, नव्याने या भागात येऊन काही उद्योगांचा विकास झालेला पाहायला मिळत नाही. त्या तुलनेत शिरवळजवळ अनेक नवीन उद्योग आले आणि त्या भागातील लोकांना रोजगार मिळाला. साताऱ्यातील अनेक लोक रोज शिरवळला नोकरीसाठी जातात आणि संध्याकाळी पुन्हा साताऱ्यात येतात; पण सातारा शहराच्या बाजूला असलेल्या एमआयडीसीमध्ये तरुणांना रोजगार मिळत नाही.

शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा तीच स्थिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताऱ्यात होणार अशा चर्चा आपण ऐकत असतो. त्यासाठी जागेची पाहणी झाली आता यावर्षी केंद्र सुरू होणार असेही सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र ते काही सुरू होत नाही. त्याशिवाय नवीन एखादी मोठी शैक्षणिक संस्था साताऱ्यात दाखल होऊन येथील मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न होतोय असेही होत नाही. शिक्षणासाठी साताऱ्यातील अनेक मुले पुण्यात जातात. त्या ठिकाणच्या वातावरणात कधी रमतात, तर कधी भरकटतात. त्यामुळे चांगल्या शिक्षणाची व्यवस्था साताऱ्यात होण्याची गरज आहे. याकडेही लोकप्रतिनिधींनी पाहण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर स्थिती

सध्या जिल्ह्याच्या एका भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. अनेक लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जनावरांची अवस्था तर न सांगण्यासारखी आहे. अशा स्थितीत या भागातील नेत्यांनी त्यांची काय व्यवस्था केली हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. अनेक गावांना पाण्यासाठी आठ-आठ दिवस वाट पाहत बसावे लागत आहे. त्या पुन्हा या भागातील राजकारण आडवे येते. हे गाव आपल्याकडे नाही. त्यामुळे त्या गावाला आपण पाणी कसे द्यायचे? असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजेच पाण्यावरूनही राजकारण करण्याचा प्रकार माण आणि खटाव तालुक्यांत सुरू आहेत. लोकांच्या दृष्टीने हे वाईट राजकारण आहे; पण त्यात अनेक गावे भरकटत आहेत.

सहकारी दूध संघ बुडाले.. खासगी कसेबसे सुरू

सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादनाची सहकारी पातळीवरील प्रक्रिया तर पूर्णपणे ठप्पच झाली आहे. काही दोन-चार खासगी दूध संघ आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यांच्याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

पर्यटनात स्वारस्य; पण कामात मागे

पर्यटनाच्या विषयात सर्वांना स्वारस्य असते; पण प्रत्यक्षात पर्यटनासाठी किती निधी आला आणि तो कसा मार्गी लागला याचा विचार लोकप्रतिनिधी करणार आहेत की नाही. पर्यटनवाढीसाठी कोणते नवीन प्रयोग जिल्ह्यात झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुनावळेत केलेल्या पर्यटनवाढीशिवाय इतर ठिकाणच्या पर्यटनस्थळांच्या विकासाकडे कोणी पाहायचे, हा देखील सवाल आहे.

Web Title: Satara Lok Sabha started with attacks; What about development points?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.