जिल्ह्यातीळ मतदान केंद्राची पाहणी सुरू

By निखिल म्हात्रे | Published: March 27, 2024 04:58 PM2024-03-27T16:58:49+5:302024-03-27T16:59:22+5:30

रायगड जिल्हा हा 32-रायगड आणि 33-मावळ अशा दोन लोकसभा मतदार संघात विभागला आहे.

Inspection of polling stations in the district started | जिल्ह्यातीळ मतदान केंद्राची पाहणी सुरू

जिल्ह्यातीळ मतदान केंद्राची पाहणी सुरू

अलिबाग - रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाची भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. या मूलभूत सुविधांची पाहणी आणि तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले.

रायगड जिल्हा हा 32-रायगड आणि 33-मावळ अशा दोन लोकसभा मतदार संघात विभागला आहे. जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की,मूलभूत सुविधा पुरविणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे, सर्व  अधिकाऱ्यांनी स्वत: मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी करून मुलभूत सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करावी.  आवश्यकते नुसार डागडुजी, दुरुस्ती करावी. सर्व मतदान केंद्रांवर प्रकाश, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्प आदींची व्यवस्था करण्यात यावी.

वेब कास्टिंगसाठी निवडलेल्या मतदान केंद्रांवर आवश्यक अटींची खात्री करावी.  ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार मतदान करतील तेथे व्हीलचेअर व स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात यावी.आयोगाच्या सूचनानुसार आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जावळे यांनी यावेळी दिल्या.
 
 जिल्ह्यातील जी मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्र बनवली जातील, ती  स्थानिक साहित्याने सुसज्ज असावीत.   कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील किमान 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग, सीसीटीव्ही किंवा व्हिडिओग्राफीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. सर्व मतदार केंद्रावर प्रथमोपचार सुविधा बरोबरच एक आरोग्य कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात यावा. आवश्यक ती सर्व औषधे मतदान केंद्रावर ठेवण्यात यावीत, असेही त्यांनी यावेळी संगितले.
 

Web Title: Inspection of polling stations in the district started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.