"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 03:25 PM2024-05-02T15:25:10+5:302024-05-02T15:26:30+5:30

Sunil Tatkare vs Anant Geete, Raigad Lok Sabha Election 2024: सुनील तटकरे यांनी रायगडच्या सभेत प्रतिस्पर्धी उमेदवाराव डागली टीकेची तोफ

Ajit Pawar led NCP Sunil Tatkare trolls Anant Geete of Shivsena over Muslim criticism at Raigad Lok Sabha Election 2024 | "अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

Sunil Tatkare vs Anant Geete, Raigad Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. निवडणूक प्रक्रिया हळूहळू एक-एक टप्पा पार पुढे जात आहे तसतसे मतदार आणि नेतेमंडळीही अधिक सक्रीय होताना दिसत आहेत. निवडणुकीचा तिसरा टप्पा ७ मे रोजी पार पडणार आहे. या टप्प्यात बारामती, रायगड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी रायगडमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे अनंत गीते असा सामना रंगणार आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार असलेले सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील तळा येथील सभेत अनंत गीते यांच्यावर टीकास्त्र सोडले.

"हिरवा अजगर, त्याला ठेचून काढा"

"देशाचे संविधान धोक्यात आले अशाप्रकारचे आरोप केले जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिले. त्या माध्यमातून देश सुरू आहे. या देशाची घटना बदलली जाणार नाही असे आम्ही सांगत आहोत. पण तरीही आंबेडकरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. अनंत गीते, तुमचे सर्व आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले. ए. आर. अंतुले यांचा उल्लेख 'हिरवा साप' केलात. मुस्लिम समाजाला 'हिरवा अजगर, त्याला ठेचून काढा' असे आवाहन केलेत आणि आज मतांसाठी अल्पसंख्याक आणि बहुजन समाजात जे सलोख्याचे वातावरण आहे, ते जाणीवपूर्वक बिघडवण्याचे काम करत आहात," असा थेट आरोप सुनिल तटकरे यांनी केला.

संसदेची निवडणूक देशाच्या अस्मितेची, देशाचे भवितव्य घडवणारी!

"या देशाच्या संसदेची निवडणूक देशाच्या अस्मितेची आणि देशाचे भवितव्य घडवणारी आहे. आम्ही घेतलेला विचार जनतेला पसंत आहे म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आंबेडकरी जनता एकत्रितपणे काम करत आहे. देशाला प्रगतीपथावर न्यायचेच आहे. या देशाची गौरवशाली वाटचाल करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे ७ मे रोजी होणार्‍या निवडणुकीत घड्याळ चिन्हावर बटण दाबत आपल्या सर्वांची सेवा करण्याची मला संधी द्या," असे आवाहन तटकरे यांनी केले.

"माझ्या अनेक कसोटीच्या काळात हा तळा तालुका माझी ताकद ठरली आहे. २००९ मध्ये या विभागाने मला साडेपाच हजाराचे मताधिक्य दिले. आतापर्यंत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका वेगवेगळ्या लढलो. आता मात्र यापुढच्या निवडणुका एकत्रितपणे लढवायच्या आहेत. या तालुक्याचे भरभक्कम प्रेम माझ्यावर आहे. त्यामुळे या तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान होईल आणि होणाऱ्या मतदानामध्ये ८० टक्के वाटा तळ्याचा असेल," असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

रूपाली चाकणकर म्हणाल्या...

"विकासाचे मुद्दे नसल्याने पाकिटे देऊन माणसे स्टेजवर बोलावली जातात आणि टिका करायला लावली जात आहेत. रायगडकर हुशार आणि सुज्ञ आहेत. तटकरे यांच्यावर प्रेम करणारे आहेत. रायगडसाठी तटकरेंचे तेवढेच योगदान असून त्यांनी पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. रायगडकर घड्याळ चिन्हावरच मतदान करतील अशी खात्री आहे," असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर म्हणाल्या.

Web Title: Ajit Pawar led NCP Sunil Tatkare trolls Anant Geete of Shivsena over Muslim criticism at Raigad Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.