Stoinis ला पैकीच्या पैकी 'मार्कस्'...! CSK ची धुलाई करून अनेक विक्रम मोडले, चेपॉकला शांत केले

IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : मार्कस स्टॉयनिसच्या ( Marcus Stoinis ) झंझावाती शतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सला IPL 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर लोळवता आले.

२११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्टॉयनिसने १२४ धावांची वादळी खेळी करून LSG ला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. यंदाच्या पर्वात LSG ने दोन्ही सामन्यांत CSK वर विजय मिळवून मोठा पराक्रम केला. स्टॉयनिसने आजच्या खेळीसह आयपीएलमधील १३ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला.

ऋतुराज गायकवाडने ६० चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह १०८ धावांची नाबाद खेळी करून CSK ला ४ बाद २१० धावांपर्यंत पोहोचवले. शिवम दुबेने २७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकरांसह ६६ धावा करताना ऋतुसह ४६ चेंडूंत १०४ धावा जोडल्या. प्रत्युत्तरात LSG ला क्विंटन डी कॉक ( ०), लोकेश राहुल ( १६) व देवदत्त पडिक्कल ( १३) असे धक्के बसले. पण, स्टॉयनिस व निकोलस पूरन या जोडीने ७० ( ३४ चेंडू) धावांची भागीदारी केली.

पूरन १५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर बाद झाला. पण, स्टॉयनिस शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने ६३ चेंडूंत १३ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १२४ धावा केल्या. दीपक हुडाने ६ चेंडूंत नाबाद १७ धावा करून स्टॉयनिससह १९ चेंडूंत ५५ धावांची विजयी भागीदारी केली. लखनौने १९.३ षटकांत ही मॅच जिंकली.

आयपीएल इतिहासातील चेपॉकवरील हा सर्वाधिक यशस्वी पाठलाग ठरला. लखनौ सुपर जायंट्सने आज २११ धावांचे लक्ष्य पार केले. यापूर्वी २०१२ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने चेपॉकवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे २०६ धावांचे लक्ष्य पार केले होते आणि तो विक्रम आज मोडला गेला.

आयपीएल सामन्यात दोन्ही डावांत शतक झळकावले गेल्याची ही पाचवी वेळ ठरली. २०२३ मध्ये विराट कोहली ( RCB) व हेनरिच क्लासेन (SRH) आणि विराट कोहली (RCB) व शुबमन गिल (GT) यांनी असा पराक्रम केला होता. २०२४ मध्ये असे तिसऱ्यांदा घडतेय. विराट कोहली (RCB) व जॉस बटलर (RR), सुनील नरीन (KKR) व जॉस बटलर (RR) आणि ऋतुराज गायकवाड (CSK) व मार्कस स्टॉयनिस (LSG) यांनी असा पराक्रम केला.

चेपॉकवरील आयपीएलमधील मार्कस स्टॉयनिसच्या नाबाद १२४ धावा या सर्वोत्तम वैयक्तिक धावा ठरल्या. याआधी २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या शेन वॉटसनने १०१ धावा केल्या होत्या. आयपीएल इतिहासातील धावांचा पाठलाग करतानाची स्टॉयनसने केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठऱली. यापूर्वी हा विक्रम पॉल व्हॅल्थॅटीच्या ( १२० नाबाद वि चेन्नई सुपर किंग्स, २०११) नावावर होता.