निवडणुकीसाठी जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त, ११ हजार जवान तैनात

By योगेश पांडे | Published: April 16, 2024 10:24 PM2024-04-16T22:24:09+5:302024-04-16T22:24:19+5:30

संवेदनशील बुथवर विशेष पोलीस बंदोबस्त : निमलष्करी दलाच्या सशस्त्र कंपन्यांचादेखील वॉच

Strict security, 11 thousand personnel deployed in the district for elections nagpur lok sabha | निवडणुकीसाठी जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त, ११ हजार जवान तैनात

निवडणुकीसाठी जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त, ११ हजार जवान तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी शहर व ग्रामीण पोलिसांतर्फे संपूर्ण जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात ११ हजारांहून अधिक जवान व अधिकारी कर्तव्यावर राहणार आहेत. यादरम्यान संवेदनशील बुथवर विशेष बंदोबस्त राहणार आहे. पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल व पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली.

नागपूर लोकसभा मतदारसंघ शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येतो. शहरात ८३९ इमारतींमध्ये २ हजार ७६५ मतदान केंद्रे आहेत. तेथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सात हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. यात तीन अपर आयुक्त, १० उपायुक्त, १७ सहायक आयुक्त, ३२१ इतर अधिकारी, ३,२१८ पुरुष आणि ९४३ महिला कर्मचारी, निमलष्करी दलाच्या ४ सशस्त्र कंपन्या (४०० कर्मचारी) आणि १ हजार ८५० होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शहरात पावणेसात हजारांहून अधिक जवान बंदोबस्तावर राहतील. अनेक मतदान बुथजवळ साध्या वेशातदेखील पोलीस राहतील. महिला मतदान केंद्रावर स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. पत्रपरिषदेला सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, अपर आयुक्त संजय पाटील, उपायुक्त निमित गोयल, श्वेता खेडकर, अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.

महिन्याभरात ८५.२८ लाख जप्त
पोलिसांनी आतापर्यंत १,६२५ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. एमपीडीए कायद्यान्वये ६ गुन्हेगारांना कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. तर २ गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तसेच अवैध दारू विक्री संबधित ३३१ व शस्त्र बाळगणाऱ्या १२३ आरोपी विरूध्द कारवाई करण्यात आली आहे. महिन्याभरात ८५ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात एमडी ड्रग्स आणि गांजाचा समावेश आहे. याशिवाय २ हजार १९३ शस्त्र तर महिण्याभरात ८ पिस्तूल आणि १२ काडतूस जप्त करण्यात आले आहे.

स्ट्रॉंग रूमवर राहणार करडी नजर
नऊ पेक्षा जास्त मतदान केंद्रे आणि संमिश्र लोकसंख्या असल्याने काही भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. शहरात २० पेक्षा अधिक जागी ९ हून अधिक मतदान केंद्र आहेत. कळमना येथील ८ ईव्हीएम वितरण केंद्र आणि स्ट्राँग रूमवरही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. १९ एप्रिल ते ४ जून या कालावधीत स्ट्राँग रूममध्ये निमलष्करी दल तैनात राहणार आहे. तेथे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, असेदेखील त्यांनी सांगितले

पोलिसांकडून सायबर पेट्रोलिंग सुरू
शहरातील सर्व प्रवेश स्थळांवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांची भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. भावना भडकविणारी भाषणे आणि सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर सायबर पेट्रोलिंगच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. अशा लोकांवर पोलीस कडक कारवाई करतील, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला.

ग्रामीण भागात २५ ठिकाणी निमलष्करी दल तैनात
ग्रामीण पोलीस हद्दीतील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या २५ भागातील मतदान केंद्रांवर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती हर्ष पोद्दार यांनी दिली. रामटेक मतदारसंघ बऱ्यापैकी पसरलेला असल्याने मनुष्यबळ तैनात करताना अधिक काळजी घेतली जात आहे. ग्रामीण पोलिस हद्दीत १,७४५ मतदान केंद्रे आहेत. तेथे १५१ अधिकारी, २,६७६ पोलीस कर्मचारी, १,५७४ होमगार्ड आणि निमलष्करी दलाच्या तीन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघात चार ईव्हीएम वितरण केंद्रे आहेत. दारू, रोख रक्कम आणि अंमली पदार्थांमध्ये गुंतलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागात ५६९ प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये ९९४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दारूबंदी अंतर्गत ३७ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. ७ गुन्हेगारांकडून रिव्हॉल्वर आणि १० जणांकडून धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाळू माफियांवर छापे टाकून २७ गुन्ह्यांमध्ये ७७ आरोपींना अटक करण्यात आली असून ६ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Strict security, 11 thousand personnel deployed in the district for elections nagpur lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.