फडणवीसांसह चार नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा मविआचा 'प्लॅन' होता; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 10:46 AM2024-04-22T10:46:23+5:302024-04-22T10:58:21+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या राज्यातील चार प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने आखला होता. तसेच भाजपाच्या काही आमदारांना फोडण्याचा डावही महाविकास आघाडीने आखला होता, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: MVA's 'plan' was to jail four leaders including Devendra Fadnavis; Chief Minister Eknath Shinde's secret blast | फडणवीसांसह चार नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा मविआचा 'प्लॅन' होता; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

फडणवीसांसह चार नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा मविआचा 'प्लॅन' होता; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी ऐन बहरात येत असतानाच राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांनाही उधाण आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेली जुगलबंदी ताजी असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या राज्यातील चार प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने आखला होता. तसेच भाजपाच्या काही आमदारांना फोडण्याचा डावही महाविकास आघाडीने आखला होता, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या  प्रचारादरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचं कटकारस्थान  मविआ सरकारने आखलं होतं, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी हल्लीच केलाय. माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना केवळ देवेंद्र फडणवीसच नाही तर गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात खटले उभे करून त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने आखला होता. एवढंच नाही तर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपाच्या आमदारांना फोडून आपल्याकडे वळवण्याचा डावही आखण्यात आला होता, असा सनसनाटी गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

तसेच या मुलाखतीदरम्यान, जागावाटपात शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येतील याबाबतही एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना १६ जागा लढणार आहे. त्यात मुंबईमधील तीन जागांचा समावेश असेल. तसेच जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नसून आम्ही ४२ जागा जिंकून २०१९ चा विक्रम मोडीत काढू, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: MVA's 'plan' was to jail four leaders including Devendra Fadnavis; Chief Minister Eknath Shinde's secret blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.