सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?

By बाळकृष्ण परब | Published: May 8, 2024 05:20 PM2024-05-08T17:20:50+5:302024-05-08T17:21:57+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना पराभवाचा धक्का देत दोन वेळा निवडून आलेले खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत होत असल्याने कोकणातील रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी कमालीची चुरशीची झाली.

Maharashtra Lok Sabha Election 2024: In Sindhudurga Narayan Rane's step forward, while these two constituencies tend towards Vinayak Raut; Who will win in Talakkonan? | सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?

सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?

- बाळकृष्ण परब
भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना पराभवाचा धक्का देत दोन वेळा निवडून आलेले खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत होत असल्याने कोकणातील रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी कमालीची चुरशीची झाली. दोन्ही बाजूंनी अनेक बड्या नेत्यांनी प्रचारामध्ये लावलेला जोर, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचण्याचा केलेला प्रयत्न याचं प्रतिबिंब मंगळवारी झालेल्या मतदानामध्येही उमटल्याचं बोललं जात आहे. कोकणातील या मतदारसंघात अगदी अटीतटीच्या वातावरणात मंगळवारी येथे सुमारे ६४ टक्के मतदान झालंय. तसेच कोकणी मतदारांनी दोन्ही प्रमुख उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद केलं. त्यानंतर आता या निवडणुकीत कुणी सरशी साधलीय, कोण पिछाडीवर पडलंय, कुठल्या मतदारसंघात कुणाला लीड मिळालं, कुठे कुणाचं गणित बिघडलं, याबाबतचे अंदाज वाड्या-वाड्यातून, राजकारणातील जाणकार मंडळी आणि नेतेमंडळींकडून वर्तवले जात आहेत. 

यावेळी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासूनच रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होणार असल्याचे संकेत मिळत होते. एकीकडे विद्यमान खासदार आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची उमेदवारी निश्चित होती. तर प्रतिस्पर्धी महायुतीकडून उमेदवारी कुणाला मिळते याबाबत उत्सुकता होती. अखेरीस महायुतीकडूनभाजपा नेते नारायण राणे यांच्या नावावर उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब झाल्याने येथील लढतीसाठीची उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यात शिवसेना सोडल्यापासून जेव्हा जेव्हा राणे आणि शिवसैनिक आमने सामने येतात तेव्हा संघर्ष, राडे होणार हे गृहित धरलं जातं. मात्र यावेळची कोकणातील ही निवडणूक या सर्वाला अपवाद ठरली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर केलेले तिखट आणि बोचरे आरोप वगळले तर संपूर्ण प्रचार शांततेत झाला. एवढंच नाही तर, जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे किमी लांब पसरलेल्या या मतदारसंघात मतदानही शांततेत पार पडलं. अगदी किरकोळ वादावादीच्या बातम्याही आल्या नाहीत. हा बदल कौतुकास्पद मानला पाहिजे. 

आता येथील मागच्या २०-२५ दिवसांतील प्रचार, दोन्ही बाजूंनी आखलेली रणनीती आणि मंगळवारी झालेलं मतदान यांचा आढावा घेतल्यास नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात अटीतटीची निवडणूक झाल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच दोन्ही बाजूंकडून आपापल्या विजयाचे दावे केले जात आहेत. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर स्थानिक पदाधिकारी, जाणकार आणि स्थानिक पत्रकार मंडळींमध्ये ज्या चर्चा सुरू आहेत, त्यांचा आढावा घेतला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांनी बऱ्यापैकी मुसंडी मारल्याचं बोलंलं जात आहे. मात्र ठाकरे गटाचं प्रभाव क्षेत्र असलेल्या कुडाळ मालवणमधील मतदारांनी चांगली साथ दिल्याने विनायक राऊत यांनीही सिंधुदुर्गात तोडीस तोड लढत दिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर रत्नागिरीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये अटीतटीची लढत झाल्याचं सांगितलं जात आहे.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात रत्नागिरीतील ३ आणि सिंधुदुर्गातील ३ विधानसभा मतदारसंघांचां समावेश होतो. आता या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मिळत असलेल्या माहितीनुसार, सावंतवाडीमध्ये भाजपाची असलेली ताकद आणि त्याला दीपक केसरकर आणि शिंदे गटाकडून मिळालेली साथ नारायण राणेंसाठी बऱ्यापैकी मदतगार ठरल्याचं बोललं जात आहे. तर काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, पर्यावरण, मायनिंगचा मुद्दा आदीही विषय प्रभावी असल्याने विनायक राऊत यांनाही या भागातून चांगलं मतदान झाल्याचं सांगितलं जात आहे. तर कुडाळमध्ये ठाकरे गटाचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात विनायक राऊत यांना झुकतं माप मिळाल्याचा दावा केला जात आहे. मात्र मागच्या काही काळात राणे आणि भाजपाने इथे बेरजेचं राजकारण करून बऱ्यापैकी पक्षप्रवेश घडवले होते. त्यामुळे दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाली आहे. या लोकसभा मतदारसंघात येणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कणकवली. मागच्या वेळी इतर पाच मतदारसंघात आघाडी घेणारे विनायक राऊत या मतदारसंघात मात्र १० हजारांनी पिछाडीवर पडले होते. कणकवलीमध्ये नितेश राणे विद्यमान आमदार आहेत. त्याचा फायदा भाजपा आणि नारायण राणे यांना झाल्याचं मतदानामधून दिसत आलं. येथे ठाकरे गटाच्या नेत्यांनीही ताकद पणाला लावली होती.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघात रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघांमधील कौल हा निर्णायक ठरत आला आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये या तीन मतदारसंघात मिळालेल्या दणदणीत मताधिक्यामुळे विनायक राऊत यांना मोठा विजय साकारता आला होता. मात्र यावेळी शिवसेनेत पडलेली फूट आणि स्वत: नारायण राणे यांनी लावलेला जोर यामुळे येथे मतदानात चुरस दिसून आली. रत्नागिरीमधील राजापूर विधानसभा क्षेत्रात येथील विद्यमान आमदार राजन साळवी यांचा प्रभाव तसेच नाणार, बारसू आदी प्रकल्पांना झालेला विरोध यामुळे भाजपाला मोठा फटका बसल्याचे संकेत मिळत आहेत. येथून विनायक राऊत यांना मागच्या दोन निवडणुकांप्रमाणेच पुन्हा एकदा मोठी आघाडी मिळण्याची शक्यता आहे.

मागच्या लोकसभेत विनायक राऊत यांना सर्वाधिक ५९ हजार मतांच लीड हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मिळालं होतं. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर येथे प्रभावी असलेले सामंत बंधू शिंदे गटात गेल्याने ठाकरे गट इथे काहीसा कमकुवत झालेला आहे. तरीही इथे ठाकरेंना मानणारा मतदार लक्षणीय आहे. तसेच काल ऐन मतदानादिवशी किरण सामंत यांचं नॉट रिचेबल नाट्य रंगल्याने त्याचाही प्रभाव मतदानावर पडला आहे. येथील एकंदरीत चित्र पाहता रत्नागिरीत दोन्ही बाजूंनी मतदान झाल्याचं चित्र आहे. चिपळूणमध्येही अटीतटीचा सामना झाल्याचा अंदाज आहे. येथे अजित पवार गटातील शेखर निकम यांच्यावर राणेंची मदार होती. तर येथे ठाकरे गटाचा असलेला प्रभाव विनायक राऊत यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. मागच्या वेळी चिपळूणमधूनही विनायक राऊत यांना ५७ हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. पण शिवसेनेत पडलेली फूट, तसेच विद्यमान आमदार शेखर निकम यांची राणेंना मिळालेली साथ यामुळे येथे अटीतटीचं मतदान झालं. तसेच येथील लढत ही बरोबरीत राहण्याची शक्यता आहे.

एकंदरीत हे कल पाहिल्यानंतर दोन्हीकडचे पदाधिकारी आणि जाणकारांचं मत विचारात घेतल्यास नारायण राणे यांना एक ते सव्वा लाखांचं मताधिक्य मिळेल, असं महायुतीकडून सांगितलं जात आहे. दुसरीकडे विनायक राऊत हे लाखभराच्या मताधिक्याने जिंकतील, असा ठाकरे गटाचा दावा आहे. एकूणच सिंधुदुर्गामध्ये घेतलेली आघाडी या निवडणुकीत नारायण राणेंसाठी लाभदायक ठरेल, असं सध्याचं चित्र आहे. मात्र पक्षात पडलेल्या फुटीनंतर रत्नागिरीत झालेलं संघटनात्मक नुकसान भरून काढून २०१९ प्रमाणे यावेळीही रत्नागिरीतून मोठी आघाडी मिळवण्यात यश आल्यास विनायक राऊत यांच्यासाठीही विजयाची संधी असेल.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: In Sindhudurga Narayan Rane's step forward, while these two constituencies tend towards Vinayak Raut; Who will win in Talakkonan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.