'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 02:16 PM2024-05-07T14:16:59+5:302024-05-07T14:33:00+5:30

Datta Bharne Viral Video : अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

Baramati Loksabha Eelction Datta Bharne first reaction on viral video | 'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा

'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा

Baramati Loksabha : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील ११ जागांसाठी राज्यात आज मतदान पार पडत आहे. यामध्ये बहुचर्चित बारामती लोकसभेची निवडणूक देखील आहे. या निवडणुकीसाठी पवार कुटुंबिय मैदानात उतरलं आहे. अशातच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही बारामतीमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे नेते आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडीओ ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओमध्ये दत्ता भरणे हे शिवीगाळ करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. याप्रकरणी आता दत्ता भरणे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे सुप्रिया सुळे यांनी तक्रार दाखल केली. त्यावर आता दत्ता भरणे यांनी भाष्य केलं आहे.

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर खळबळ उडाली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर इंदापूरात दत्ता भरणे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. त्यानंतर व्हिडीओमध्ये दत्ता भरणे यांनी त्या व्यक्तीला शिवीगाळ केल्याच्या दिसत आहे. याप्रकरणी दत्ता भरणे त्यांच्या गावातील आणि आसपासमधील गावातील लोकांना शिवीगाळ करून धमकावत आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तसेच व्हायरल व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवत तक्रार दाखल केली. दुसरीकडे या सगळ्याप्रकरणावर एबीपी माझासोबत बोलताना दत्ता भरणे यांनी इशारा दिला आहे. व्हिडीओमध्ये दत्ता भरणे हे  तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही. बारामती अॅग्रोचा कुणीही येणार नाही असे म्हणताना दिसत आहेत.

"मी माझ्या मराठी भाषेत बोललो शिवीगाळ केलेली नाही. मतदान सुरु असताना तालुक्यामध्ये मी फिरत होतो. फिरत असताना अंतुरणे येथे मला बुथच्या अलीकडे कार्यकर्त्यांची गर्दी दिसली. कार्यकर्त्यांचे भांडण सुरु असून तिथे पैसे वाटप होत असल्याचे मला समजले. तिथे बारामती अॅग्रोचा एक कर्मचारी गावकऱ्यांशी वेगळ्या भाषेत होतो. मी तिथे आलोय हे त्याला कळलं नव्हतं. त्यावेळी त्याने माझ्याविषयी चुकीचा शब्द वापरला. मी तिथे नसतो अनर्थ घडला असता. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. गावकरी त्याच्या अंगावर धावून गेले असते. माझ्याविषयी गावकऱ्यांमध्ये चुकीचं बोलत असल्याने मी त्याला माझ्या भाषेमध्ये बोललो.  तो काही राजकीय कार्यकर्ता नाही," असे दत्ता भरणे यांनी म्हटलं.

"मी दबाव टाकत असेल तर तिथे असलेल्या लोकांचा जबाब घ्या आणि त्यांनाच विचारा. पैशाचे वाटप, नोकरीचे आमिष कोण दाखवत होतं हे तिथे असलेल्या लोकांना विचारा. निवडणूक आयोगाला आम्ही हे सगळं सांगू. मी तक्रार करणारा माणून नाही. पण माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर त्याला योग्य कायदेशीर उत्तर देईल," असेही दत्ता भरणे म्हणाले.

रोहित पवारांचा आरोप

“केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडीओत बघा. विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही”, असे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Web Title: Baramati Loksabha Eelction Datta Bharne first reaction on viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.