निवडणूक जुमल्याचे नवीन नाव गॅरंटी, आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 05:19 PM2024-04-29T17:19:23+5:302024-04-29T17:21:40+5:30

'दहा वर्षांत बहुमतातील भाजप सरकारने देशाची वाट लावली'

The new name of election jumla is guarantee, Aditya Thackeray criticism | निवडणूक जुमल्याचे नवीन नाव गॅरंटी, आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

निवडणूक जुमल्याचे नवीन नाव गॅरंटी, आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

कोल्हापूर : भाजपच्या निवडणूक जुमल्याचे नवीन नाव गॅरंटी असल्याची टीका शिवसेना (ठाकरे गट) युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी करवीर तालुक्यातील उचगाव येथे बोलताना केली. गेल्या दहा वर्षांत बहुमतातील भाजप सरकारने देशाची वाट लावली, असा आरोप ठाकरे यांनी केला. कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ठाकरे बोलत होते.

भाजपने सत्तेत येण्यापूर्वी १५ लाख रुपये खात्यात टाकण्याचे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, रोजगार देण्याचे, अशी विविध आश्वासने दिली होती; पण ती पूर्ण केली नाहीत. नंतर त्यांनी सांगितले की, हा निवडणूक जुमला होता. आता याच जुमल्याचे नाव गॅरंटी असे ठेवले आहे. गेली दहा वर्षे सत्तेत असतानाही त्यांनी जनतेच्या मनातील बात जाणून घेतली नाही, असे ठाकरे म्हणाले.

आपल्या विरोधात बोलणाऱ्यांवर कोणी आरोप केला की, त्यांना लगेच जेलमध्ये टाकले जाते. असले हुकूमशाही सरकार मागच्या ७५ वर्षांत पाहिले नाही. दहा वर्षे सत्ता भोगल्यानंतर भाजपचे नेते काँग्रेसने काय केले, असे विचारत आहेत. सत्ता असताना तुम्ही काय केले, ते सांगा, असे आव्हानही ठाकरे यांनी यावेळी दिले.

नोटाबंदी केल्याने काळा पैसा परत आला का, देशातील आतंकवाद संपला का, देशातील शंभर शहरे ही स्मार्ट सिटी होणार होती, ती झाली का, अशी विचारणाही ठाकरे यांनी केली. यावेळी उमेदवार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, अरुण दुधवडकर, संजय पवार, विजय देवणे, व्ही.बी. पाटील, रविकिरण इंगवले, सरपंच मधुकर चव्हाण उपस्थित होते.

Web Title: The new name of election jumla is guarantee, Aditya Thackeray criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.