Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 11:19 PM2024-05-08T23:19:30+5:302024-05-08T23:20:57+5:30

JP Nadda Viral Screenshot Fact Check, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपाचे सर्व बडे नेतेमंडळी प्रचारसभांना हजेरी लावताना दिसत आहेत.

Fact Check of JP Nadda Viral Screenshot regarding 300 terrorists to enter in India and voting NDA amid Lok Sabha Election 2024 | Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य

Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य

Claim Review : भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी निवडणूक भाषणादरम्यान देशात 300 दहशतवादी घुसण्याची भीती दाखवून NDAला मतदान करण्याचे आवाहन केले.
Claimed By : Facebook User
Fact Check : दिशाभूल

Created By: पीटीआय फॅक्ट चेक
Translated By: ऑनलाइन लोकमत

JP Nadda Viral Screenshot Fact Check, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कथित स्क्रीनशॉटच्या मथळ्यात लिहिले आहे की, नड्डा म्हणाले- 300 दहशतवादी देशात घुसणार आहेत, NDAला विजयी करण्याचे आवाहन”. सोशल मीडिया युजर्स हा व्हायरल स्क्रीनशॉट शेअर करून दावा करत आहेत की भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांच्या निवडणूक भाषणादरम्यान देशात 300 दहशतवादी घुसण्याची भीती दाखवून एनडीएला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने यासंदर्भात तपास केला आणि व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले. सत्य पडताळणीत आढळले की व्हायरल स्क्रीनशॉट दैनिक भास्करमध्ये प्रकाशित झालेल्या चार वर्ष जुन्या बातमीचा आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये बक्सरमधील निवडणूक प्रचारादरम्यान जेपी नड्डा यांनी गुप्तचर संस्थांच्या अहवालाचा हवाला देत 300 दहशतवादी देशात घुसणार असल्याचे भाष्य केले होते. भाषणादरम्यान त्यांनी सीमा सुरक्षेसाठी एनडीए आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळेच सध्याच्या निवडणुकीशी संबंध लावून सोशल मीडियावर करण्यात येत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे.

दावा- फेसबुक यूजर रियाझ एम. खान यांनी व्हायरल स्क्रीनशॉटसह लिहिले, "मुस्लिम, मंगळसूत्र, पाकिस्तान, म्हैस यांच्यानंतर आता निवडणुकीत दहशतवादीही आले आहेत… पण नड्डा यांना कसे कळले की 300 दहशतवादी देशात घुसणार आहेत?”

6 मे रोजी शेअर केलेल्या पोस्टची लिंक, अर्काईव्ह लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सुशील चौधरी नावाच्या दुसऱ्या एका फेसबुक युजरने व्हायरल स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिले, “आता, नड्डा यांना कसे कळले की 300 दहशतवादी देशात घुसणार आहेत? कारण विकास, रोजगार आणि महागाई नियंत्रण याच्या नावावर मते मिळवणे शक्य नाही हे नड्डा यांना माहीत आहे का? आता नड्डा यांना देशातील जनतेला घाबरवून मते मिळवायची आहेत का?" पोस्टची लिंक, अर्काईव्ह लिंक येथे पहा.

गायिका नेहा सिंह राठोडने #LokSabhaElections2024 वापरून 'X' वर लिहिले, “नड्डाजींना कसे कळते की 300 दहशतवादी देशात घुसणार आहेत? नड्डा जी कोणत्या सुरक्षा एजन्सीचे प्रमुख आहेत? विकास, रोजगार आणि महागाई नियंत्रणाच्या नावावर मते मिळवणे शक्य नाही हे नड्डाजींना माहीत आहे का? नड्डाजींना देशातील जनतेला घाबरवायचे आहे का?

या पोस्टची लिंक, अर्काईव्ह लिंक येथे पहा.

हाच व्हायरल स्क्रीनशॉट इतर अनेक वापरकर्त्यांनी देखील त्याच दाव्यांसह शेअर केला आहे.

सत्य पडताळणी-

2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटची सत्यता जाणून घेण्यासाठी, डेस्कने प्रथम Google द्वारे बातम्यांचे शीर्षक शोधले. यावेळी, आम्हाला दैनिक भास्करच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला सुमारे चार वर्षे जुना अहवाल सापडला. 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएच्या बाजूने एका सभेला संबोधित केले होते, असे सांगण्यात आले. बक्सरच्या फोर्ट ग्राउंडवर लोकांना संबोधित करताना ते म्हणाले होते, “आजचा अहवाल आहे की 300 दहशतवादी देशात घुसणार आहेत. आमचे सैनिक त्यांना ठार करतील. जे वाचतील त्यांना मृत्युदंड मिळेल.” प्रचारादरम्यान नड्डा यांनी सीमा सुरक्षेच्या आधारावर एनडीए आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले होते.

संपूर्ण बातमीसाठी येथे क्लिक करा.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, डेस्कने संबंधित कीवर्डच्या मदतीने गुगलवर शोध घेतला. यावेळी, आम्हाला भाजपच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर बक्सरमध्ये झालेल्या रॅलीचा संपूर्ण व्हिडिओ मिळाला.

10 ऑक्टोबर 2020 रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओच्या 43:20 मिनिटांपासून 43:40 मिनिटांपर्यंतच्या भागात, नड्डा गुप्तचर संस्थांच्या अहवालाचा हवाला देत आणि 300 दहशतवादी देशात घुसणार असल्याचा उल्लेख करताना दिसतात.

पूर्ण व्हिडिओसाठी येथे क्लिक करा.

20 ऑक्टोबर 2020 रोजी 'आज तक' या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील सुमारे 300 दहशतवादी थंडीच्या मोसमाचा फायदा घेऊन भारतात घुसण्याचा विचार करत होते. गुप्तचर यंत्रणांचा हवाला देत अहवालात असे म्हटले आहे की, दहशतवादी सात वेगवेगळ्या ठिकाणांहून भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते.

येथे क्लिक करून संपूर्ण अहवाल वाचा.

भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, जेपी नड्डा यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बिहारमधील भागलपूर, खगरिया, मधुबनी, अररिया आणि मुझफ्फरपूरमध्ये जाहीर सभांना संबोधित केले आहे. बक्सरमध्ये त्यांनी अद्याप एकही सभा घेतलेली नाही.

येथे आणि येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पहा.

आमच्या आतापर्यंतच्या तपासातून हे स्पष्ट झाले की, सध्याच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान जेपी नड्डा यांनी देशात ३०० दहशतवादी घुसल्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. बिहार विधानसभा निवडणूक 2020 च्या प्रचारादरम्यान, भाजपा अध्यक्षांनी गुप्तचर संस्थांच्या अहवालाचा हवाला देत देशात 300 दहशतवादी घुसल्याचे सांगितले होते. आमच्या तपासणीत हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले.

(निष्कर्ष: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ३०० दहशतवादी देशात घुसणार असल्याची भीती दाखवून मतदारांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मतदान करण्याचे आवाहन केल्याचा व्हायरल हा दिशाभूल करणारा आहे.)

(सदर फॅक्ट चेक 'पीटीआय फॅक्ट चेक' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Check of JP Nadda Viral Screenshot regarding 300 terrorists to enter in India and voting NDA amid Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.