अजितदादांनीच आम्हाला २०१९ला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 01:27 PM2024-04-13T13:27:06+5:302024-04-13T13:29:27+5:30

Ajit Pawar: मल्हार पाटलांच्या या दाव्याने अजित पवारांचीच राजकीय कोंडी झाली असून त्यांनी मल्हार पाटील यांना कानउघडणी केल्याची चर्चा आहे.

It was Ajit pawar who sent us to BJP in 2019 and now he has come A sensational claim by Malhar Patil | अजितदादांनीच आम्हाला २०१९ला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा दावा

अजितदादांनीच आम्हाला २०१९ला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा दावा

Malhar Patil Speech ( Marathi News ) : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी प्रचारसभेत केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना प्रत्युत्तर देताना मल्हार पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आम्हाला २०१९ साली भाजपमध्ये पाठवलं होतं, असा दावा केला आहे. मल्हार पाटलांच्या या दाव्याने अजित पवारांचीच राजकीय कोंडी झाली असून त्यांनी मल्हार पाटील यांना कानउघडणी केल्याची चर्चा आहे.

ओमराजे निंबाळकरांवर टीका करताना मल्हार पाटील म्हणाले की, "अजितदादांमुळे आम्ही राष्ट्रवादी पक्ष सोडल्यााचा आरोप विरोधकांनी केला. अरे किती खोटं बोलाल? आम्ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि अजितदादांच्या सहमतीनेच २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की, त्यांनीच आम्हाला आधी पाठवलं आणि मग आता ते भाजपसोबत आले," असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला आहे.

ओमराजेंवर घणाघात

धाराशिवचे  विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर मल्हार पाटलांनी शेलक्या शब्दांत टीका केली. "तुम्ही आमची चिंता करू नका. आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी आहे, आमच्या हृदयात भाजप आहे आणि आमचा हातात धनुष्यबाण आहे. त्यामुळे आम्ही महायुतीचं काम पूर्ण ताकदीने करून महायुतीचं वर्चस्व या मतदारसंघामध्ये तयार केल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांकडे मुद्दा नाही, त्यांच्याकडे लोकंही नाहीत. फक्त सोशल मीडियावर ते हिरोगिरी करत बसतात. त्या व्हॉट्सअॅपवर आणि इंस्टाग्रामवर यांचं आयुष्य गेलं," असं पाटील यांनी म्हटलं आहे.

धाराशिवमध्ये पुन्हा कुटुंबात रंगणार राजकीय लढाई

महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. इकडे महायुतीत मात्र जागा कोणी लढवायची, यावरून बरेच दिवस खल सुरू होता. मागच्या शनिवारीच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) सोडण्याचा निर्णय झाला होता. यानंतर तुल्यबळ उमेदवार शोधण्यात दोन दिवस गेले. यानंतर उमेदवारीबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच अंतिम केला. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करवून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अर्चना पाटील या मागील टर्ममध्ये जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राहिलेल्या आहेत. राजकीय क्षेत्रात त्यांचा वावर असल्याने उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक यंदाही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, दोन वेळा विधानसभा निवडणुकीत आमनेसामने आल्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही ओम राजेनिंबाळकर विरुद्ध राणाजगजितसिंह पाटील यांच्यात झाली होती. हे दोघेही नात्याने चुलत बंधू आहेत. आता यावेळी पाटील यांच्या पत्नी रिंगणात असल्याने भाऊबंदकी यावेळी कायम राहिली असून, यावेळी दीर-भावजयीत सामना रंगणार आहे.

Web Title: It was Ajit pawar who sent us to BJP in 2019 and now he has come A sensational claim by Malhar Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.