उस्मानाबादेत हायव्होल्टेज लढत, ११ वाजेपर्यंत केवळ १७ टक्के मतदान

By चेतनकुमार धनुरे | Published: May 7, 2024 11:23 AM2024-05-07T11:23:40+5:302024-05-07T11:42:02+5:30

दुपारी १ ते २ वाजेदरम्यान तापमान ४३ अंशापर्यंत पोहोचेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

High voltage contest in Osmanabad but polling slow, 14 per cent votes till 11 am | उस्मानाबादेत हायव्होल्टेज लढत, ११ वाजेपर्यंत केवळ १७ टक्के मतदान

उस्मानाबादेत हायव्होल्टेज लढत, ११ वाजेपर्यंत केवळ १७ टक्के मतदान

धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानाला सोमवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात मतदानाला फारशी गर्दी झाली नाही. यामुळे ९ वाजेपर्यंत केवळ ५.७९ टक्के इतकेच मतदान नोंदवले गेले आहे. दरम्यान, यानंतर मात्र मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पहायला मिळाली. 

११ वाजेपर्यंत सुमारे १७.०६ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. सकाळी ११ वाजता उन्हाचा पारा ३७ अंशावर पोहोचला होता. दुपारी १ ते २ वाजेदरम्यान तापमान ४३ अंशापर्यंत पोहोचेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे मतदानाचा टक्का या वेळेत कमी राहण्याचीही शक्यता आहे.

भीमनगरातील मतदान यंत्र बिघडले...
धाराशिव शहरातील भीम नगर भागातील मतदान केंद्रावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मतयंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. मतदान केल्यानंतर आवाज येत नसल्याने केंद्राध्यक्षांनी दुसऱ्या मशिनची मागणी नोंदवली.जवळपास अर्धा तास यामुळे मतदान ठप्प होते.

उस्मानाबाद मतदारसंघात ३१ उमेदवार
मागील २० दिवस चाललेल्या प्रचाराच्या रणधुमाळीनंतर आज मतदानाला सुरुवात झाली. येथे लोकसभेसाठी ३१ उमेदवार उभे आहेत. या सर्व उमेदवारांचे भविष्य मतदार मतयंत्रात आज सील करतील. यानंतर थेट ४ जूनलाच मतदारांचा कौल समोर येणार आहे.

हायव्होल्टेज लढत 
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात हायव्होल्टेज लढत होत आहे. महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडीसह विविध प्रादेशिक पक्ष-संघटनांचे व अपक्ष असे एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघात यावेळी १९ लाख ९२ हजार ७३७ मतदारांची नोंद झालेली आहे. यापैकी पहिल्यांदाच मतदान करीत असलेले २९ हजार ८१९ नवमतदारही नोंदले गेले आहेत. निवडणूक आयोगाने यावेळी ८५ वर्षे वयावरील व दिव्यांग मतदारांसाठी घरून मतदानाची सोय केली होती. २ ते ५ मे या कालावधीत त्यांचे मतदान झाले आहे. जवळपास ९४ टक्के मतदान त्यांचे नोंदविले गेले आहे.

६ मतदान केंद्र संवेदनशील
दरम्यान, मतदारसंघात औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, परंडा, बार्शी या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात एकूण २ हजार १३९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील ६ मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या सर्वच मतदान केंद्रांवर सुमारे १० हजार अधिकारी-कर्मचारी, पोलिस नियुक्त आहेत. 

दिवसभरात ४३ अंश तापमानाचा अंदाज
उमेदवारांची संख्या ३१ असल्याने यावेळी दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागत आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालेल. दिवसभरात कमाल ४३ अंश तापमानाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने सकाळच्या सत्रातच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: High voltage contest in Osmanabad but polling slow, 14 per cent votes till 11 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.