भावी खासदारासाठी ‘गृहमंत्री’ मैदानात; उन्हातान्हाची पर्वा न करता कुटुंबांचा प्रचारात हातभार

By विजय सरवदे | Published: May 2, 2024 07:09 PM2024-05-02T19:09:22+5:302024-05-02T19:09:55+5:30

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे मुख्य उमेदवार नशीब आजमावत आहेत.

'Home Minister' in the field for future MP; Wife and Families contributed to the campaign regardless of the heatwave | भावी खासदारासाठी ‘गृहमंत्री’ मैदानात; उन्हातान्हाची पर्वा न करता कुटुंबांचा प्रचारात हातभार

भावी खासदारासाठी ‘गृहमंत्री’ मैदानात; उन्हातान्हाची पर्वा न करता कुटुंबांचा प्रचारात हातभार

छत्रपती संभाजीनगर : निवडणूक रिंगणात असलेल्या एकाही उमेदवाराची पत्नी राजकारणी नाहीत. मात्र, अटीतटीच्या या लढाईत आपल्या पतीकरिता विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रमुख उमेदवारांच्या पत्नींनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता या त्या आपापल्या पक्षीय विचाराच्या महिलांसोबत घरोघरी जाऊन दिवसभर प्रचार करीत असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे नशीब आजमावत आहेत. सध्या तरी या तीन उमेदवारांमध्येच काट्याची लढत दिसत असली, तर अन्य उमेदवारही मतांची वजाबाकी करण्यात कमी नाहीत. त्यामुळे संदीपान भुमरे यांच्या पत्नी पुष्पा भुमरे, चंद्रकांत खैरे यांच्या पत्नी वैयजयंती खैरे आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्नी रुमी जलील यांनी प्रचारात झोकून दिले आहे.

गृहमंत्र्यांचा दहा-दहा तास प्रचार 
- वैजयंती खैरे : सकाळी आठ वाजल्यापासून प्रचाराला सुरुवात करतात. मध्यंतरी थोडा विश्राम घेतल्यानंतर पुन्हा सायंकाळी काही तास गाठीभेटीवर भर दिला जातो. दिवसभरातून किमान ८- १० तास तरी प्रचार केला जातो.

- पुष्पा भुमरे : सकाळी नऊ वाजता महिलांसोबत घराबाहेर पडून ओळखीचे, नातेवाईक व मतदारांच्या भेटी घेतल्या जातात. सकाळी घराबाहेर पडल्यानंतर रात्रीच घराकडे परततात. भुमरे साहेब निवडून येणे कसे गरजेचे आहे, हे मतदारांना पटवून देण्यावर भर असतो.

- रुमी जलील : सकाळी ९-१० च्या सुमारास ठरावीक महिलांसोबत प्रचारार्थ घराबाहेर पडतात. प्रचाराची टीम ही मतदारसंघ पिंजून काढत असली, तरी जेथे जाणे आवश्यक आहे, अशाच ठिकाणी जाऊन मतदारांना विश्वास देतात.

गाठीभेटी घेण्यावर
महायुतीतील घटक पक्षांच्या महिलांसोबत घराबाहेर पडते. मतदारसंघातील नातेवाईक आणि मतदारांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेण्याचा सध्या नित्यक्रम चालू आहे. पालकमंत्र्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात झालेल्या विकासकामांची माहिती दिली जाते.
- पुष्पा भुमरे

कार्यक्षम खासदाराची गरज
सकाळी लवकरच कामकाज आटोपून महिलांसोबत प्रचारासाठी घराबाहेर पडते. अनेक महिलांना भेटून पाच वर्षांच्या कारकिर्दीत खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या कामांची माहिती देते. जिल्ह्याला कार्यक्षम खासदाराची गरज, याकडे मतदारांचे लक्ष वेधले जाते.
- रुमी जलील

सगळ्यांसोबत संवाद साधला जातो
शिवसेनेच्या, तसेच महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत ‘डोअर टू डोयर’ जाऊन खैरे साहेबांना निवडून आणण्यासाठी मशाल चिन्हाचा प्रसार प्रचार करीत आहोत. महिलांना थेट किचनमध्ये जाण्याची परवानगी असल्यामुळे सगळ्यांसोबत संवाद साधता येताे.
- वैजयंती खैरे

Web Title: 'Home Minister' in the field for future MP; Wife and Families contributed to the campaign regardless of the heatwave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.