पहिल्याच ईव्हीएमवर आले प्रमुख पक्षांचे उमेदवार; ३७ उमेदवारांसाठी लागणार तीन मशीन्स 

By विकास राऊत | Published: May 2, 2024 03:47 PM2024-05-02T15:47:57+5:302024-05-02T15:48:27+5:30

निशाणी मंजुरीसाठी उजाडली पहाट; जिल्हाधिकाऱ्यांसह संपूर्ण यंत्रणेचे रात्रभर जागरण

Candidates of major parties appeared on the first EVM; Three machines required for 37 candidates | पहिल्याच ईव्हीएमवर आले प्रमुख पक्षांचे उमेदवार; ३७ उमेदवारांसाठी लागणार तीन मशीन्स 

पहिल्याच ईव्हीएमवर आले प्रमुख पक्षांचे उमेदवार; ३७ उमेदवारांसाठी लागणार तीन मशीन्स 

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणातील ३७ उमेदवारांपैकी पहिल्याच ईव्हीएममध्ये प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत. चंद्रकांत खैरे (शिवसेना-ठाकरे गट), संदीपान भुमरे (शिवसेना), संजय जगताप (बसपा), अफसर खान यासीन खान (वंचित बहुजन आघाडी) व खा. इम्तियाज जलील (एमआयएम) हे प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत. प्रमुख पक्षांसह ३७ उमेदवार रिंगणात असल्याने तीन ईव्हीएम निवडणुकीसाठी लागणार आहेत.

अपक्ष उमेदवारांना सोमवारी सायंकाळी ५ वाजता निवडणूक चिन्हांचे (निशाणी) वाटप झाले. मात्र, निवडणूक आयोगाकडून त्या चिन्हांना मंजुरी मिळण्यासाठी मंगळवारची पहाट उजाडली. पहाटे ३:३० वाजेपर्यंत सर्व अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात बसून होते. चिन्हांना मंजुरी दिल्याचा ई-मेल आल्यानंतर पहाटे ४ वाजता अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सोडले.

निवडणूक रिंगणातील ३७ उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले. राष्ट्रीयीकृत व नोंदणीकृत राजकीय पक्षांना चिन्हवाटप केल्यानंतर अपक्ष उमेदवारांना पसंतीनुसार तसेच चिन्हांसाठी स्पर्धा लागल्यामुळे सोडतीनुसार चिन्ह देण्यास सायंकाळचे ५ वाजले. सर्व चिन्हांची यादी मंजुरीसाठी रात्री ७ वाजेच्या सुमारास निवडणूक आयोगाला दिली. चवथ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघातून यादी आल्यामुळे अंतिम मंजुरी देण्यास आयोगाला विलंब झाला. रात्री उशिरापर्यंत मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाला होती. मध्यरात्र झाली तरी आयोगाकडून ई-मेल आला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह संपूर्ण यंत्रणा जिल्हाधिकारी कार्यालयातच होती. मंजुरीसाठी एवढा वेळ लागल्यामुळे प्रशासन चिंतातुर झाले.

दरम्यान, पहाटे ३:३० वाजता निवडणूक आयोगाकडून चिन्हवाटप आणि मतपत्रिकेच्या मंजुरीला ई-मेल आल्यानंतर पहाटे ४ वाजता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे आदींनी सुटकेचा नि:श्वास सोडून कार्यालय सोडले.

प्रचारात असतील मजेशीर चिन्हे
गॅस सिलिंडर, जहाज, नागरिक, अंगठी, पेनाची निब, फळाची टोपली, शिलाई मशीन, ट्रक, तुतारी, ऊस शेतकरी, पेट्रोलपंप, हिरा, कपाट, ऑटो रिक्षा, कढई, कूलर, टीव्ही रिमोट, सफरचंद, नारळाची बाग, विजेचा खांब, लिफाफा, शाळेचे दप्तर, शिट्टी, प्रेशर कूकर, इस्त्री, बासरी, संगणक, रोड रोलर, काचेचा पेला, स्पॅनर, हिरवी मिरची, दूरचित्रवाणी संच, बॅट अशी मजेशीर चिन्हे अपक्ष उमेदवारांना मिळाली आहेत.

मराठी मुळाक्षरांप्रमाणे नावे
मराठी मुळाक्षरांप्रमाणे फॉर्म सेव्हन - ए मतपत्रिकेला मंजुरी मिळाली. त्यानुसार उमेदवारांची नावे मतपत्रिकेत क्रमानुसार आली आहेत.
-देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी निवडणूक

Web Title: Candidates of major parties appeared on the first EVM; Three machines required for 37 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.