विजयाच्या जल्लोषात शिवसेना-भाजपा वरचढ

By admin | Published: February 24, 2017 07:28 AM2017-02-24T07:28:06+5:302017-02-24T07:28:06+5:30

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला.

Shiv Sena-BJP prevailed in victory | विजयाच्या जल्लोषात शिवसेना-भाजपा वरचढ

विजयाच्या जल्लोषात शिवसेना-भाजपा वरचढ

Next

पंकज पाटील /उल्हासनगर
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. तर, शिवसेनेनेदेखील गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकून आपले वर्चस्व निर्माण केले.
निवडणुकीचा पहिला कल हा पॅनल क्रमांक १७ मधून आला. या पॅनलमध्ये सर्व चारही जागा राष्ट्रवादीने जिंकल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मात्र, जसजसे निकाल बाहेर पडू लागले, तसे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मर्यादित राहिले आणि मतमोजणी केंद्राबाहेर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांचीच गर्दी एकवटण्यास सुरुवात झाली. शिवसेनेसोबत भाजपाच्या विजयाचे निकाल लागत असल्याने दोन्ही पक्षांच्याच कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी दिसत होती. विजयी उमेदवारांच्या नावांचा जयघोष सर्वत्र घुमत होता. मतमोजणी कें द्राच्या बाहेर दोन्ही बाजूंना कार्यकर्त्यांची गर्दी झालेली होती. वाढती गर्दी पाहून पोलीसदेखील ती आवरण्याचा प्रयत्न करत होते. मतदान केंद्राप्रमाणेच शहरात पक्ष कार्यालयातदेखील कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. उमेदवारांचे कार्यालयही कार्यकर्त्यांनी भरलेले होते. भाजपाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. कार्यालयात बसून निवडणुकीच्या निकालावर लक्ष ठेवण्यात येत होते. जसजसे निकाल पुढे येत होते, त्याप्रमाणे भाजपा कार्यालयात जल्लोष सुरू होता. मात्र, शिवसेनेच्या बाबतीत शहरातील शाखांमध्येच कार्यकर्ते बसून निकालाचा कल जाणून घेत होते. उल्हासनगरच्या निकालाची प्र्रतीक्षा सर्वांनाच असली, तरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे खरे लक्ष उल्हासनगरपेक्षा मुंबई-ठाण्यावर जास्त होते. ज्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात होता, ते उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह मतमोजणीच्या ठिकाणी गेले होते.
शिवसेना आणि भाजपाच्या पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी होती तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या कार्यालयांबाहेर शुकशुकाट पसरलेला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आपल्या खाजगी कार्यालयात बसून इतर निकालांचा वेध घेण्याचे काम करीत होते. साई पक्षाच्या कार्यालयात सुरुवातीला नाराजीचे वातावरण होते. दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांच्या बाजूने एकही निकाल न आल्याने साई पक्ष मागे पडला की काय, अशी भीती होती. मात्र, निकालाच्या शेवटच्या सत्रात साई पक्षाच्या बाजूने चांगला निकाल लागल्याने साई पक्षाचा शेवट गोड झाला. अपेक्षित यश आणि सत्तेच्या केंद्रस्थानी राहील, एवढा आकडा गाठल्याने साई पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष भगवान भालेराव यांना ओमी कलानी यांनी पाडण्याचा प्रयत्न केला, तरीही ते निवडून आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. रिपाइंच्या बाबतीत कहीं खुशी कहीं कम, अशी स्थिती निर्माण झाली होती.

कुठे आसू तर कुठे हासू
सत्तेची गणिते काहीही असली तरी विजयी उमेदवारांनी आनंद अत्यंत जल्लोषात साजरा केला. उमेदवार जरी मतमोजणी केंद्रात असले तरी बाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आपला आनंद व्यक्त केला. या जल्लोषात शिवसेना आणि भाजपा या दोन्हीच पक्षांचे झेंडे दिसत होते. तर, इतर पक्षांचे झेंडे मतमोजणी केंद्रापासून दूर राहिले. मतदान केंद्राप्रमाणेच शहरात पक्ष कार्यालयातदेखील कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. उमेदवारांचे कार्यालयही कार्यकर्त्यांनी भरलेले होते. शिवसेना आणि भाजपाच्या पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी होती तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या कार्यालयांबाहेर शुकशुकाट पसरलेला होता.

Web Title: Shiv Sena-BJP prevailed in victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.