‘संगू प्लाझा’ तोडण्याचे आदेश

By Admin | Published: February 22, 2017 06:30 AM2017-02-22T06:30:58+5:302017-02-22T06:30:58+5:30

डोंबिवलीतील नांदिवली पंचनंद परिसरातील ‘संगू प्लाझा’ ही बेकायदा इमारत तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने

Order to break 'Sangu Plaza' | ‘संगू प्लाझा’ तोडण्याचे आदेश

‘संगू प्लाझा’ तोडण्याचे आदेश

googlenewsNext

कल्याण : डोंबिवलीतील नांदिवली पंचनंद परिसरातील ‘संगू प्लाझा’ ही बेकायदा इमारत तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या कारवाईचा अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. जमीन मालक आणि विकसक यांच्यातील वादामुळे रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, आम्ही जायचे तरी कुठे?, असा सवाल त्यांनी केला आहे.
‘संगू प्लाझा’ या तीन मजली इमारतीचे बांधकाम ग्रामपंचायत अस्तित्वात असताना झाले आहे. त्यात सध्या २० कुटुंबे आहेत. बेकायदा बांधकाम केल्याचा मुद्दा उपस्थित करीत जमीन मालकाने विकसकाविरोधात दाखल केलेल्या दाव्यावर उच्च न्यायालयाने इमारत तोडण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाविरोधात सर्वाेच्च न्यायालयातही धाव घेण्यात आली होती; परंतु या न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. मात्र या आदेशाची प्रत अद्यापपर्यंत महापालिकेला प्राप्त झालेली नाही. उच्च न्यायालयाच्या मूळ आदेशानुसार, इमारतीवरील कारवाईचा अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यास केडीएमसीला सांगण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.
जमीन मालक आणि विकसकाच्या वादाप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल असलेल्या दाव्यावर २०११ मध्येच इमारत तोडण्याचे आदेश एमएमआरडीएला देण्यात आले होते. मग आजवर कारवाई का झाली नाही? असा सवालही रहिवाशांनी उपस्थित केला आहे. मार्च २००६ मध्ये तत्कालीन ग्रामपंचायतीने बांधकामास मंजुरी दिली. त्यानंतर आॅगस्ट २००६ मध्ये एमएमआरडीएला प्राधिकरण म्हणून नेमण्यात आले. मग एमएमआरडीएला देखील बांधकाम बेकायदा ठरविण्याचा अधिकार आहे का?, आम्ही नियमित कर भरत आहोत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
यासंदर्भात ‘ई’ प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधला असता न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विकसक सोनुभाई वैष्णव यांनी आपण रहिवाशांच्या बाजूने आहोत. आपण कोणतेही बेकायदा बांधकाम केलेले नसल्याचे सांगितले. एकाच सातबाराच्या मंजुरीवर दोन इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. यातील एकच इमारत बेकायदा कशी ठरू शकते, असा सवाल त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

आम्ही जायचं तरी कुठे?
जमीन मालक आणि विकासक यांच्या वादात येथील रहिवाशांना नाहक मन:स्ताप होतो आहे. ६० वर्षीय भीमराव पाटील हे निवृत्त आहेत. त्यांची बायपास झाली आहे. पत्नीसह राहणाऱ्या पाटील यांनी आता आम्ही या उतारवयात जायचे तरी कुठे? असा सवाल केला आहे. कैलास लखारा हे देखील चिंतेत आहेत. त्यांची मुलगी १० वीच्या वर्षाला आहे. मार्चमध्ये बोर्डाची परीक्षा आहे. प्रॅक्टिकल परीक्षा सध्या सुरू आहे. बेघर होण्याच्या भीतीमुळे तिच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. आमचे संपूर्ण कुटुंबच तणावात असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Order to break 'Sangu Plaza'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.