सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> व्यापार >> स्टोरी
खासगी सुरक्षा व्यवस्था बाजारातही बाबा रामदेव
First Published: 15-July-2017 : 00:12:01

हरिद्वार : योगगुरू रामदेव बाबा यांनी ग्राहक वस्तू (एफएमसीजी) आणि आयुर्वेदिक उत्पादनाच्या व्यवसायाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न चालविला असून, आता ४0 हजार कोटी रुपये उलाढाल असलेल्या खासगी सुरक्षा व्यवस्था बाजाराकडे लक्ष वळविले आहे. बाबांनी ‘पराक्रम सुरक्षा प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची नवी कंपनी स्थापन केली असून, ही कंपनी तरुणांना खासगी सुरक्षारक्षक बनण्यास प्रशिक्षण देणार आहे. प्रशिक्षक म्हणून निवृत्त लष्करी आणि पोलीस अधिकाऱ्यांची सेवा घेणार आहे.

रामदेव बाबा यांनी एक निवेदन जारी करून आपल्या नव्या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘पराक्रम सुरक्षा, आपकी रक्षा’ असे आपल्या नव्या कंपनीचे घोषवाक्य आहे. पतंजलीने योग, आयुर्वेद आणि स्वदेशी याबाबत लोकांना संवेदनशील बनविले आहे. आता लोकांना सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.

अलीकडील वर्षांत खासगी सुरक्षा व्यवस्था व्यवसायाने उत्तम वृद्धी मिळविल्याचे दिसले आहे. ‘फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ने (फिक्की) केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. अभ्यासानुसार खासगी सुरक्षा व्यवस्था उद्योगाची वार्षिक उलाढाल सध्या ४0 हजार कोटी आहे. २0२0 पर्यंत या व्यवसायाचा महसूल ८0 हजार कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

पतंजली योगपीठाच्या सूत्रांनी सांगितले की, कंपनीच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण पतंजलीच्या हरिद्वार येथील केंद्रात सुरू झाले आहे. येथे दर महिन्याला १00 तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कॉर्पोरेट आॅफिसेस, व्यक्ती आणि शॉपिंग मॉल यांना सुरक्षा पुरविण्याचे काम कंपनी करेल. (वृत्तसंस्था)

>पतंजलीमुळे अनेकांना धडकी

रामदेव बाबा यांनी २00६ मध्ये पतंजली आयुर्वेदची स्थापना केली होती. गेल्या दशकभराच्या काळात पतंजलीने प्रचंड यश मिळविले आहे. गेल्या वित्त वर्षातील पतंजलीचा महसूल तब्बल १0,५६१ कोटी रुपये होता. पतंजलीच्या उत्पादनांनी बड्या-बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना धडकी भरविली आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com